Delhi vs Railway: बीसीसीआयने करारबद्ध खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक केल्यानंतर अनेक स्टार खेळाडू रणजी ट्रॉफीसाठी मैदानात उतरले. याला विराट कोहलीही अपवाद नव्हता. विराट तब्बल १३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी मैदानात उतरला.
तो सध्या दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात असलेल्या दिल्ली विरुद्ध रेल्वे संघातील सामन्यात खेळत आहे. या सामन्यात तो दिल्लीकडून २५ वर्षीय आयुष बडोनीच्या नेतृत्वात हा सामना खेळत आहे.
दरम्यान, स्टार खेळाडू खेळत असल्याने चाहत्यांची त्याला खेळताना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये झुंबड उडाली. हजारोंच्या संख्येने चाहते स्टेडियममध्ये हजर होते. स्टेडियमबाहेर जवळपास २-३ किमी रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे एका देशांतर्गत सामन्याला इतकी गर्दी होण्याची ही दुर्मिळ घटना आहे.
याचदरम्यान आता अशी माहिती समोर येत आहे की आयुष बडोनीला त्याला नाणेफेकीवेळी निर्णय बदलावा लागला होता. Cricket Ception या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार आयुषने पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
पण स्टेडियममध्ये वाढती प्रेक्षक संख्या पाहाता त्याला दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने त्वरित निर्णय घेत बडोनीला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यास सांगितले. ज्यामुळे विराटची फलंदाजी लगेच येणार नाही आणि थोडं नियंत्रित करण्यासाठी थोडा वेळ मिळेल.
मात्र, आयुषने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतल्यानंतरही प्रेक्षकांच्या संख्येवर नियंत्रण फारसं घालता आलं नाही.
त्यामुळे स्टेडयमबाहेर काही काळ गोंधळाचं वातावरणही निर्माण झालं होतं. त्यासाठी पोलिसांना आणि सुरक्षा रक्षकांना प्रेक्षकांना नियंत्रित करण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
याचदरम्यान, एका चाहत्याने सुरक्षा भेदत मैदानात प्रवेशही केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याला नंतर सुरक्षारक्षकांनी मैदानातून बाहेर नेले.
सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर रेल्वेने पहिल्या डावाक ६७.४ षटकात सर्वबाद २४१ धावा केल्या. त्यांच्याकडून उपेंद्र यादवने ९५ धावांची खेळी केली, तर कर्ण शर्मा याने ५० धावांची खेळी केली. दिल्लीकडून नवदीप सैनी आणि सुमीत माथूर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच सिद्धार्थ शर्मा आणि मोवी ग्रेवाल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर पहिल्या दिवस अखेर दिल्लीने १० षटकात १ बाद ४१ धावा केल्या आहेत. दिल्लीने अर्पित राणाची १० धावांवर विकेट गमावली. तसेच सनत सांगवान आणि यश धूल नाबाद आहेत. सनत ९ धावांवर आणि यश धूलने नाबाद १७ धावा केल्या.