Varade Beating : वराडेतील मारहाणीत शिवडेचा युवक गंभीर: तळबीड पोलिसांत गुन्हा; तिघे संशयित ताब्यात
esakal January 31, 2025 02:45 PM

वहागाव : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत कऱ्हाड तालुक्यातील वराडे येथे एका युवकास पुण्यातील जुन्या तिघा मित्रांनी मागील भांडणाचा राग मनात धरून मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली. मारहाणीत शिवडेचा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर कऱ्हाडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशांत महादेव शेंडगे (वय २४, रा. शिवडे, ता. कऱ्हाड) असे या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मारहाणीच्या घटनेनंतर हल्लेखोर पुण्याच्या दिशेने पसार झाले होते. घटनेची नोंद तळबीड पोलिसांत झाली आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवारी सायंकाळी वराडे (ता. कऱ्हाड) येथील राष्ट्रीय महामार्गालगत वन विभागाच्या नर्सरी समोरील शेतात एक युवक गंभीर जखमी होऊन पडल्याची माहिती तळबीड पोलिसांना मिळाली. त्यानंतर तळबीड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव ऊन जखमीला उपचारासाठी कऱ्हाड येथील रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे दारूच्या बाटल्यांसह अन्य वस्तू पोलिसांना मिळून आल्या आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात जखमी युवकावर दगडाने हल्ला केला असावा, तसेच हल्लेखोर हे त्याच्याच संपर्कातील त्याचे साथीदार असल्याची चर्चा आहे. जुन्या कारणावरून वादावादी होऊन त्यानंतर मारहाणीचा प्रकार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, काल घटना समोर आल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांना जखमी युवकाची ओळख पटली आहे. पोलिसांनी याप्रकरणी काल रात्रीपासून आज दिवसभर तपास करून या मारहाणप्रकरणी पुण्यातील तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र, हल्ला करण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.

जखमींवर कऱ्हाडच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेची माहिती काल वराडेचे पोलिस पाटील सुदाम शिरसाट यांनी तळबीड पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.