मुंबई : शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून कंपनी पहिल्यांदाच आपल्या भागधारकांना बाेनस शेअर्स देणार आहे. या वर्षी कंपनी तिच्या लिस्टिंगची १० वर्षे साजरी करत आहे. यावेळी बोनस शेअर्सची घोषणा करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना बाेनस शेअर्सचा लाभ देणारी ही कंपनी ग्रीनलॅम इंडस्ट्रीज लिमिटेड आहे.
रेकॉर्ड तारीखग्रीनलॅम इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळाने १:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्सना मान्यता दिली आहे. म्हणजे कंपनी भागधारकांकडे असलेल्या प्रत्येक शेअरसाठी एक मोफत शेअर जारी करेल. बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, असे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. दरम्यान, आज शुक्रवारी ग्रीनलॅम इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स घसरून ५३५ रुपयांवर व्यवहार करत आहेत.
यापूर्वी लाभांश दिला ग्रीनलॅम इंडस्ट्रीज लिमिटेड पहिल्यांदाच बोनस शेअर्स देणार आहे. कंपनीने यापूर्वी लाभांश दिला आहे. तसेच स्टॉक स्प्लिट केले आहेत. परंतु कधीही बोनस शेअर्स जारी केले नव्हते. कंपन्या त्यांच्या मुक्त राखीव निधीचे भांडवलीकरण करण्यासाठी, प्रति शेअर कमाई (EPS) आणि भांडवल वाढवण्यासाठी तसेच राखीव निधी कमी करण्यासाठी बोनस शेअर्स जारी करतात. हे शेअर्स कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय शेअरहोल्डर्सना दिले जातात आणि म्हणूनच त्यांना मोफत शेअर्स असेही म्हणतात.
डिसेंबर तिमाहीचे निकालकंपनीने डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. ग्रीनलॅम इंडस्ट्रीज लिमिटेडचा कामकाजातील महसूल ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ६.९ टक्के वाढून ६०२ कोटी रुपये झाला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा महसूल ५६३ कोटी रुपये होता. लॅमिनेट व्यवसायात वर्षानुवर्षे ४ टक्के वाढ झाली आणि व्हॉल्यूममध्ये २.६ टक्के वाढ झाली. कंपनीचा इंजिनिअर्ड फ्लोअर्स, इंजिनिअर्ड डोअर्स आणि प्लायवुड व्यवसाय अनुक्रमे १३.८ टक्के, ४९.५ टक्के आणि ९०.७ टक्के वाढला. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत १२.५ कोटी रुपयांचा नफा नोंदवला. गेल्या वर्षी याच तिमाहीत नफा २५ कोटी रुपये होता.