Election Commission : यमुनेत विष सापडल्याचे पुरावे द्या; निवडणूक आयोगाची अरविंद केजरीवाल यांना विचारणा
esakal January 31, 2025 05:45 PM

नवी दिल्ली : ‘‘यमुना नदीत कुठे कुठे आणि कोणत्या प्रकारचे विष सापडले याची माहिती सादर करावी, असे निर्देश निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना दिले आहेत. आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावत केजरीवाल यांना पाच प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आहे.

दिल्लीला सोडल्या जाणाऱ्या पाण्यात हरियाना सरकार विष मिसळत असल्याचा आरोप करून केजरीवाल यांनी खळबळ उडवून दिली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप आणि भाजप यांच्यात यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

आयोगाने याआधी बजावलेल्या नोटिशीला केजरीवाल यांनी उत्तर दिले होते. मात्र त्यामुळे समाधान न झाल्याने आयोगाने केजरीवाल यांना पुन्हा नोटीस बजावली आहे. पाण्यातील अमोनियाचे वाढलेले प्रमाण आणि नदी विषयुक्त करण्याच्या गंभीर आरोपाची सरमिसळ करू नका.

विष मिसळल्याच्या आरोपाप्रकरणी तुम्ही पुरावे दिलेले नाहीत, असे आयोगाने नोटिशीत म्हटले आहे. या प्रश्नांची उत्तरे देण्यास आयोगाने केजरीवाल यांना सांगितले आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत नोटिशीला उत्तर द्यावयाचे आहे.

तुमचे आरोप हे दोन राज्यांमध्ये युद्ध घडविण्यासारखे असल्याची टिप्पणी आयोगाने केली आहे. आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी केजरीवाल यांना शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. ‘‘तुमचे आरोप हे दोन राज्यांमध्ये युद्ध भडकविणारे आहेत,’’ अशी टिपणी आयोगाने केली आहे

पाकने देखील असे आरोप केले नाहीत

‘‘पाकिस्तानने देखील केले नाहीत, असे आरोप केजरीवाल यांनी केले आहेत,’’ असे भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘‘जे लोक स्वत:ला इमानदार असल्याची पदवी देत होते, त्यांचा खोटेपणा उघडा पडला आहे. नदीच्या स्वच्छतेसाठी निधीची तरतूद आहे, मात्र तो वापरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे,’’ असे त्रिवेदी यांनी नमूद केले.

‘पाणी पिण्याचे सैनी यांनी नाटक केले’

दरम्यान, हरियानाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी यमुना नदीचे पाणी पिण्याचे नाटक केल्याची टीका केजरीवाल यांनी केली आहे. ‘‘सैनी यांनी पाणी पिण्याचे नाटक केले आणि नंतर ते थुंकले. नदीचे पाणी विषयुक्त असल्याचा आरोप मी करीत आहे, तर हे लोक माझ्यावरच खटला दाखल करत आहेत. दिल्लीच्या लोकांनी विषारी पाणी प्यावे, अशी यांची इच्छा आहे. मात्र मी हे घडू देणार नाही,’’ असा आरोप केजरीवाल म्हणाले.

या प्रश्नांची उत्तरे द्या

  • हरियाना सरकारकडून नदीत कोणत्या प्रकारचे विष मिसळले गेले?

  • दिल्ली जल बोर्डाच्या ज्या इंजिनिअरला विष

  • सापडले, त्याचे

  • नाव काय?

  • विष सापडल्याचे ठोस पुरावे दिले द्या

  • कुठे कुठे हे विष सापडले आहे?

  • विषयुक्त पाणी रोखण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.