संगमनेर : खराडी परिसरासह तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असून, अनेक ठिकाणी नागरिकांना बिबटे दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना घराबाहेर पडणे ही अवघड झाले आहे. लहान मुलांमध्येही भीतीचे वातावरण आहे. यावर आता वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी व्यथा खराडी (ता. संगमनेर) येथील सरपंच ज्योती पवार यांनी मांडली.
खराडी परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. याचबरोबर दूध व्यवसायही मोठा असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे चारा क्षेत्रही मोठे आहे. यामुळे शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांना बिबटे दिसत आहेत, तर गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी परिसरात धुमाकूळही घातला आहे. सायंकाळ झाली की, घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे.
दुसरीकडे शेतातील पिकांना बिबट्यांच्या भीतीमुळे पाणी भरणेही अवघड आहे. जिकडे पाहावे, तिकडे बिबटेच दिसत आहे. बिबट्यांच्या भीतीमुळे महिलाही शेतात जाण्यासाठी घाबरू लागल्या आहेत. खराडी परिसरात काही महिन्यांपासून बिबट्या पहावयास मिळत आहे. यामुळे वन विभागाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.