IND vs ENG 4th T20I Pune: धक्क्यातून वेळीच सावरले, Hardik Pandya-शिवम दुबे गरजले! इंग्लंडसमोर तगडे लक्ष्य ठेवले
esakal February 01, 2025 06:45 AM

4th T20I Match Marathi update: भारतीय संघाचे आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद केल्यानंतर इंग्लंडला सामना आपलाच असे वाटले होते. पण, अभिषेक शर्मा व रिंकू सिंग यांनी त्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंग्लंडने पुनरागमन करताना ७९ धावांवर यजमानांचा निम्मा संघ तंबूत पाठवला होता. आता तरी सामन्यावर पकड घेतली असे इंग्लंडला वाटत असताना हार्दिक पांड्या ( ) व शिवम दुबे ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि सहाव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या गोलंदाजांची वाट लावली.

संजू सॅमसनने पुन्हा एकदा निराश केले. सूर्यकुमार यादवचा फॉर्म त्याच्यावर आजही रुसलेला दिसला आणि तिलक वर्मा गोल्डन डकवर माघारी परतल्याने भारताला १२ धावांवर ३ धक्के सहन करावे लागले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला फलंदाजीला बोलावले आणि मालिकेत पहिलाच सामना खेळणाऱ्या साकिब महमूदने त्याच्या पहिल्या षटकात तीन विकेट्स घेतल्या. पहिल्या चेंडूवर त्याने संजूला ( १) चुकीचा फटका खेळण्यास भाग पाडून झेलबाद केले. त्यानंतर आलेला तिलक वर्मा पहिल्याच चेंडूवर षटकार मारायला गेला अन् जोफ्रा आर्चरच्या हाती झेल देऊन बसला. सूर्याने हॅटट्रिक होऊ दिली नसली तरी षटकाच्या शेवटच्या चेंडूवर महमूदने त्याला जाळ्यात अडकवले. टीम इंडियाचा कर्णधार भोपळ्यावर झेलबाद झाला.

पॉवर प्लेमध्ये सर्वाधिकवेळा तीन किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा मान महमूदने पटकावला. भारताच्या भुवनेश्वर कुमार, झिम्बाब्वेच्या रिचर्ड एनगाराव्हा, अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान, अर्जेंटिनाचा हर्नान फेनेल व मलेशियाच्या पवनदीप सिंगने ही कामगिरी केली आहे. अभिषेक शर्मा व रिंकू सिंग यांनी चांगले फटके मारून भारताची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. पण, आदील राशीदने पुन्हा फिरकीची जादू दाखवली. अभिषेक १९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २९ धावांवर बाद झाला.

ब्रेडन कार्सेने ११व्या षटकात रिंकू सिंगला माघारी जाण्यास भाग पाडले. रिंकूने २६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३० धावा केल्या. भारताचा निम्मा संघ ७९ धावांवर माघारी पाठवण्यात इंग्लंडला यश आले होते. पण, हार्दिक पांड्या व शिवम दुबे यांनी सामन्याचे चित्रच बदलले. या दोघांनी खणखणीत फटके खेचताना संघाला ५ बाद ७९ धावांवरून दीडशे पार पोहोचवले. ज्या साकिबने भारताला पहिल्याच षटकात तीन धक्के दिले होते, त्याला ४-१-३५-३ अशी स्पेल संपवावी लागली. जोफ्राही ४ षटकांत ३७ धावा देत महागडा ठरला. शिवम ३४ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांवर रन आऊट झाला. भारताने ९ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारली.

हार्दिकने २८ चेंडूत षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले आणि सूर्यासह सर्वांनी त्याचे कौतुक केले. १८व्या षटकात हार्दिक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याने ३० चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. भारताकडून ट्वेंटी-२०त सहावी किंवा त्या खालच्या क्रमांकावरील ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. अक्षर पटेल व सूर्यकुमार यादव यांनी २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ९१ धावा जोडल्या होत्या. शिवमनेही ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. जेमी ओव्हरटन याने हार्दिकनंतर अक्षर पटेलला ( ५) माघारी पाठवले.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सहाव्या आणि सातव्या क्रमांकावरील फलंदाजांनी अर्धशतक झळकावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी शेरफाने रुथरफोर्ड ( ६७) व आंद्र रसेल ( ७१) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थवर अशी खेळी केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.