भाद्रपद महिन्यात घराघरांत पार्थिव गणेशाची पूजा, उपासना केली जाते. एका विशिष्ट उटण्यापासून, एका विशिष्ट प्रकारच्या मातीपासून आदिशक्ती पार्वतीने एक मूर्ती तयार केली आणि त्यामध्ये तिने म्हणजे स्वतः आदिशक्तीने शक्तीचा स्पर्श केला आणि गणेश देवता तयार झाली.
दहा दिवस गणेशाशी एकरूप झाल्यानंतर, त्याला आपली सुख-दुःखे सांगितल्यानंतर पुन्हा निसर्गाच्या माध्यमातून शक्तीला आपल्यापर्यंत परत आणावे व या शक्तीने आपले दुःखनिवारण करावे, समृद्धी द्यावी, ज्ञान द्यावे, स्मृती द्यावी व सर्व जीवन मंगलमय करावे या अपेक्षेने श्रीगणपतीचे पूजन करून दहाव्या दिवशी पाण्यात विसर्जन केले जाते. ही झाली पार्थिव गणेशाची उपासना.
मुळात श्री गणपती ही स्वयंभू देवता आहे. देवता म्हणजे एखादी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी असलेली शक्ती आणि अधिकार. स्वयंभू म्हणजे निसर्गतः, जगाच्या कल्याणासाठी अगदी सुरुवातीला, आद्य देवता म्हणून तयार झालेली अशी ही देवता आहे.
वस्तुमान, शक्ती आणि संकल्पना, यातून सर्व जगाच्या पसाऱ्याची योजना करणे, त्याची वाढ करणे, हा पसारा चालविण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयासाठी विवेकबुद्धी देणे या सर्वांसाठी श्री गणेश ही देवता आवश्यक असते. भौतिक, शारीरिक पातळीवर संपर्कासाठी प्रथम लिंगस्वरूपात व नंतर मानवी स्वरूपात स्वीकारलेली असते. स्वयंभू मूर्तींचे विसर्जन केले जात नाही. यांचा उत्सव माघ महिन्यात साजरा केला जातो.
महाराष्ट्रातील अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी असलेल्या मूर्ती मनुष्याने तयार केलेल्या नाहीत, तर तेथे स्वयंभू पाषाण आहेत. ज्यातून प्रसारित होणारे शक्तितरंग जाणवू शकतात, त्यांच्याशी संभाषण होऊ शकते आणि मनोवांछित कामना पूर्ण करण्यासाठी त्यांची मदत घेता येते असा अनेकांचा अनुभव आहे. कोकणात खेडकुळी येथे आम्हा तांबे कुटुंबीयांचे स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे.
आमच्या पूर्वजांपैकी एकजण प्रत्येक चतुर्थीला गणपतीपुळ्याला दर्शनाला जात असत. एका चतुर्थीला खूप ताप आलेला असल्यामुळे त्यांना गणपतीपुळ्याला जाणे शक्य नव्हते. आज श्री गणपतींचे दर्शन होणार नाही, या विचाराने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तापामुळे ग्लानीत असताना त्यांना प्रत्यक्ष श्री गणपतीचे दर्शन झाले व दृष्टांत झाला, ‘ऊठ, डोक्यावरून पाणी घे, घराच्या पलीकडे अमुक ठिकाणी ये, तेथे मी प्रकट होऊन तुला दर्शन देतो.’ त्यांनी तापातच स्नान केले, गणपतींनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले आणि खरोखरच गणपतीपुळ्याच्या गणपतीने त्यांना तेथे दर्शन दिले.
श्री गणपती जेथे प्रकट झाले तेथेच हे मंदिर आहे. म्हणूनच गणपतीपुळ्याच्या व खेडकुळीचा गणपतीच्या मंदिरात एकाच तऱ्हेची शक्तीची स्पंदने जाणवतात. या मंदिराच्या व्यवस्थेचा, पूजेचा अधिकार तांबे घराण्याकडे आहे. येथे माघी चतुर्थीच्या निमित्ताने दरवर्षी चार दिवसांचा उत्सव असतो. केवळ तांबे घराण्यातीलच नव्हे तर अन्य अनेक मंडळीही या उत्सवासाठी येतात. हा गणपती पावतो असा अनेकांचा अनुभव असल्यामुळे बरीच मंडळी येथे येऊन श्री गणपतीला साकडे घालतात.
सध्याच्या युगात स्मार्ट जीवनपद्धतीसाठी अत्यंत सोपी उपासना म्हणजे श्री गणेशाची उपासना. श्री गणपतीप्रमाणेच सध्याच्या जीवनात संगणक आवश्यक साधन झालेले आहे. म्हणून ‘ॐ गं गणपतये नमः’ असे म्हणण्याबरोबरीने ‘ॐ सं गणकाय नमः’ म्हणण्याची आवश्यकता आहे.
श्री गणपती हा गणांचा नायक, तसा संगणक हाही गणांचाच नायक आहे. सर्व विघ्नांचा नाश करून प्रत्येक इच्छित गोष्ट तडीला नेता यावी, पूर्णत्वाला पोचावी, सर्व काही मंगल व्हावे, मध्ये कोणतेही विघ्न येऊ नये व यातून वैयक्तिक जीवात्म्याला यश मिळावे म्हणून मदत करणारी देवता म्हणजे श्री गणपती.
संपूर्ण विश्र्वातील स्मृती एकत्र घेऊन, तसेच सध्याच्या वर्तमानकाळात काय घडते आहे याची माहिती घेऊन, संगणक वापरणाऱ्याला हवी ती माहिती लगेच उपलब्ध करून देणारा तो संगणक. तेव्हा श्री गणपती व संगणक यांच्यात साधर्म्य असणे नक्कीच शक्य आहे.
ज्ञानेश्र्वर माऊलींनी श्री गणपतीला ‘आद्या’ म्हणजे ‘तू सृजन करणारे ब्रह्म आहेस’ असे म्हटले आहे. ब्रह्मदेवाने म्हणजे सृजनकर्त्याने अगदी सुरुवातीला जो काही विचार केला असेल त्या विचाराचेच नाव गणपती आहे, आपण कुठलाही उपक्रम सुरू करणार असलो त्यासाठी मेंदूरूपी संगणकाची आवश्यकता असतेच.
श्री गणपती हा जसा स्मृतिदाता, बुद्धिदाता आहे, त्याप्रमाणे संगणकामध्येही स्मृतीला खूप महत्त्व असते. संगणकातील स्मृती जितकी जास्त तितकी तिच्या मदतीने ताबडतोब आणि जलद गतीने माहिती मिळवता येते. जे जे मनोवांछित असेल ते सर्व श्री गणपतीच्या प्रार्थनेने मनुष्याच्या जीवात्म्याला त्याच्या उन्नतीसाठी, आत्मसमाधानासाठी, यशप्राप्तीसाठी, तेजाच्या प्राप्तीसाठी मिळू शकते. मेंदूमधील कॉर्टेक्स या भागातील केंद्रांना सहकार्य देण्याचे काम श्री गणपतीच्या उपासनेमुळे म्हणजेच नादशक्तीमुळे होऊ शकते. मेंदूमध्येच मनाचेही वास्तव्य असते, या सगळ्यांना श्री गणपतीच्या सहकार्याची आवश्यकता असते.
अगदी याचप्रमाणे संगणकाच्या मदतीनेही आपल्याला जे काही करायचे असेल ते करता येते. संगणक निर्जीव, बाह्यशक्तीवर चालणारा तर मेंदू सजीव, अंतर्शक्तीवर चालणारा आणि श्री गणपती तर प्रत्यक्ष चैतन्यस्वरूप, आत्मप्रकाशी परमात्मा होय.
श्री गणपतीची उपासना करून आपले मनोवांछित पूर्ण करता येते, तसेच संगणकाच्या माध्यमातून आपल्याला वैयक्तिक स्तरावर मनोवांछित पूर्ण करता येते. श्री गणेश व संगणक यांच्यात फरक एवढाच, की संगणक पार्थिव स्वरूपामध्ये असतो, मात्र त्यातील तत्त्वे श्री गणेशांच्या संकल्पनेवर आधारित असतात. संगणक मर्यादित आहे.
आपल्या शरीरातील मेंदूरूपी संगणकही मर्यादित आहे, मात्र त्याला अमर्याद करण्यासाठी आपल्याला श्री गणेश संकल्पनेचा व त्याच्या कृपेचा उपयोग करून घ्यायचा आहे. बाह्य जगतामध्ये, पार्थिव जगतामध्ये कितीही विकास झाला, नाना तऱ्हेच्या सुविधा उत्पन्न झाल्या तरी मनुष्याला मेंदूच्या कार्यक्षमतेवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
संगणकाने कितीही मदत केली तरी शरीरस्थ गणेशविद्येचा अभ्यास करून, त्यावर श्रद्धा दृढ करून, श्री गणपतीच्या कृपेनेच बाह्यविश्वाचा आनंद घेता येऊ शकेल. हे लक्षात घेतल्यास श्री गणपती म्हणजे निव्वळ संगणक नव्हे हे समजू शकेल. बाह्यविकासासाठी संगणकाची जशी गरज आहे, तसेच प्रत्येकाने काही वेळ स्वतःला देऊन स्वतःमध्ये असलेल्या गणेशदेवतेची गणेशविद्येच्या साहाय्याने उपासना करावी आणि सुखी जीवनाचा अनुभव घ्यावा.
संगणक बाह्यजगतातील व्यवस्थापनासाठी वापरता येतो. यामुळे काही प्रमाणात विजय व सुख मिळू शकते. पार्थिव गणेश म्हणजेच मेंदूरूपी संगणकाची प्रसन्नता जीवनात सुख, समृद्धी, मनःशक्ती, मनःशांती, यश व समाधान देणारी असते. आणि स्वयंभू श्री गणेश आत्मसमाधान, परमानंद, श्रेयस, श्रद्धा, कल्याण, आत्मशांती देणारा असतो. म्हणून संगणक, पार्थिव गणेश व स्वयंभू श्री गणेश देवता या सर्वांची उपासना आवश्यक असते.
गणपतीची उपासना म्हणजेच मेंदूची उपासना. दिवा लावून रोज श्रीगणेशस्तोत्र, श्री अथर्वशीर्ष किंवा ‘ॐ गँ गणपतये नमः’ वगैरे शास्त्रशुद्ध पद्धतीने गाणे, सामाजिक व सामुदायिक एकात्मतेसाठी प्रयत्न करणे तसेच गरजवंतांना मदत करणे हे व्रत उपयोगी पडेल.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यान, निरुपणांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)