मैत्रीचा सुंदर गारवा
esakal February 01, 2025 11:45 AM

- संदीप पाठक आणि मृण्मयी देशपांडे

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सुंदर मैत्रीच्या गोष्टी ऐकायला मिळतात; पण अभिनेता संदीप पाठक आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांची मैत्री म्हणजे अगदी मनाला भिडणारी आणि मनस्वी भावनेने भारलेली. त्यांच्या नात्याला केवळ सहकलाकार म्हणून मर्यादा नाहीत, तर ती एका घट्ट आणि निःस्वार्थी मैत्रीच्या उंबरठ्यावर उभी आहे. अनेक चित्रपट, नाटकं आणि कार्यक्रमांमध्ये सोबत काम करताना त्यांच्यात एक वेगळीच केमिस्ट्री तयार झाली, जी केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही टिकून आहे.

संदीप म्हणतो, ‘मृण्मयीला मी तिच्या ‘कुंकू’ या मालिकेपासून बघत आलो आहे. तिच्या अभिनयानं मी भारावून गेलो आणि तेव्हापासूनच तिचा चाहता झालो. आम्ही आधी काही पुरस्कार सोहळ्यांमध्ये भेटलो होतो; पण खरी ओळख झाली ती ‘एक राधा, एक मीरा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान.’ त्यांनी ‘नटसम्राट’ चित्रपटातही सोबत काम केलं आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोदरम्यानही अनेक आठवणी तयार झाल्या.

मृण्मयीच्या स्वभावाबद्दल बोलताना तो म्हणतो, ‘मृण्मयी खूप मनमिळाऊ आणि इमोशनल आहे. ती कामापुरतं कोणाशी संबंध ठेवत नाही, तर माणसांशी कायमस्वरूपी नाती जोडते. तिच्या खरेपणामुळे ती सगळ्यांना हवीहवीशी वाटते. ती स्वतःच्या कष्टानं इथपर्यंत पोचली आहे आणि मला तिचा खूप अभिमान वाटतो.’

मृण्मयी म्हणते, ‘संदीपसोबत खऱ्या अर्थानं मैत्री ‘एक राधा, एक मीरा’च्या सेटवर झाली. त्यावेळी आम्ही खूप वेळ एकत्र घालवला आणि आमच्यात निखळ मैत्रीचं नातं तयार झालं.’ संदीपच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल ती म्हणते, ‘तो खूप सज्जन आणि सुस्पष्ट विचारांचा माणूस आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व ओपन आहे, त्यामुळे त्याच्याशी सहज कनेक्ट होता येतं.’

ती पुढे म्हणाली, ‘त्याचा अभिनय खूप समर्पक आणि आत्मीयतेनं भारलेला असतो. सेटवर तो नेहमी एक सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो, सेटवर वातावरण हलकंफुलकं ठेवण्याची जबाबदारी तो घेतो आणि त्यामुळे कामाचा ताणही जाणवत नाही.’

मृण्मयीच्या मते, संदीपच्या वाचनाची आवड आणि अभिनयावरील निष्ठा हा त्याचा मोठा प्लस पॉइंट आहे. ‘तो भूमिकेसाठी झपाटलेला असतो आणि त्याचं काम मनापासून करतो. त्याच्या कोणत्याही भूमिकेत तो सहज मिसळतो आणि त्या पात्राचा जीव होतो.’

एक आठवण सांगताना संदीप म्हणाला, ‘स्लोव्हेनियामध्ये ‘एक राधा, एक मीरा’च्या शूटिंगदरम्यान मृण्मयी काही वैयक्तिक अडचणींमधून जात होती. अशा वेळी एखाद्याला फक्त एक चांगला मित्र किंवा मैत्रीण हवी असते, जो फक्त ऐकून घेईल आणि आधार देईल. त्या काळात तिला तो भावनिक आधार माझ्याकडून मिळाला आणि आमची मैत्री अधिक दृढ झाली.’

मृण्मयीसाठी संदीप हा एक असा मित्र आहे, जो कधीही बदलावा असं वाटत नाही. ‘तो जसा आहे तसाच योग्य आहे. त्याची मोकळीक, संवेदनशीलता, आणि आपुलकी हे सगळं त्याला खास बनवतं,’ ती म्हणते.

संदीपच्या मते, ‘मित्र म्हणजे वणव्यामधला गारवा असतो’, तर मृण्मयी म्हणते, ‘कोणतीही काटछाट न करता आपल्याला जसा आहोत तसंच स्वीकारणारी व्यक्तीच खरी मैत्रीण किंवा खरा मित्र असतो.’

(शब्दांकन : मयूरी गावडे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.