समृद्ध मन आणि मानसिक समृद्धी
esakal February 01, 2025 11:45 AM

- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक

आज गणेश जयंती. गणेश म्हणजे विघ्नहर्ता, गणेश म्हणजे सुखकर्ता, आणि गणेश म्हणजे समृद्धी दाता. तो रिद्धी, सिद्धी आणि बुद्धी दर्शवतो, ज्या अनुक्रमे समृद्धी, आध्यात्मिक शक्ती आणि बुद्धीचे प्रतिनिधित्व करतात. मग आजच्या या मंगलदिनी आपण या मंगल ऊर्जेचं आवाहन आपल्या आयुष्यात आणि ‘मनात’ कशा प्रकारे करू शकतो?, हाच विचार माझ्या मनात होता, आणि मग वाटलं, की या समृद्धीचा स्रोत असलेल्या गणरायांकडे आपण मनाच्या समृद्धीसाठी प्रार्थना नक्कीच करू शकतो.

मनाची समृद्धी म्हणजे काय?

कारण समृद्धी हा शब्द आपण ऐकतो, तेव्हा आपल्याला सर्वप्रथम आर्थिक किंवा भौतिक समृद्धीबद्दल विचार येतो. कारण समृद्धी म्हणजे लक्ष्मी, समृद्धी म्हणजे भौतिक सुख-वस्तूंची भरभराट, असं एक चित्र आपल्या डोळ्यांसमोर निर्माण होतं. आणि समृद्धीची ही व्याख्या किंवा कल्पना अगदी स्वाभाविक आहे, त्यात चुकीचं असं काहीच नाही. सकारात्मक आकांशा असणं हे आपल्या यशासाठी खूप महत्त्वाचं असतं; पण ही फक्त भौतिक समृद्धी झाली. या बरोबर जेव्हा मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धी असते, तेव्हा भौतिक आणि आर्थिक समृद्धी अधिक अर्थपूर्ण बनते.

मग मानसिक समृद्धी, किंवा समृद्ध मन म्हणजे नक्की काय? मानसिक समृद्धी म्हणजे आपली वैचारिक प्रगल्भता, आणि भावनिक श्रीमंती. जे मन भावना आणि विचारांनी श्रीमंत आहे ते एक समृद्ध मन आहे. मग वैचारिक आणि भावनिक समृद्धी हे दोन्ही पैलू आज आपण थोडे समजून घेऊयात.

1) वैचारिक समृद्धी - वैचारिक समृद्धी म्हणजे निरंतर काही नवीन शिकण्याची मानसिकता, मानसिकरीत्या कुशाग्र राहण्याची आणि काळाप्रमाणे विचारांची जडणघडण करण्याची मानसिकता. आपली विचार करण्याची क्षमता ही आपली एक शक्ती आहे. म्हणून आपण त्याला विचारशक्ती असं म्हणतो. काळाप्रमाणे सतत काहीतरी नवीन शिकणं, विचारांमध्ये लवचिकता ठेवणं, यामुळे आपली बौद्धिक प्रगती होते, आणि जिथं बुद्धीवर्धन असतं, तिथं लक्ष्मीसुद्धा आपला आशीर्वाद देत असते आणि आजच्या या वेगानं बदलणाऱ्या जगात, आपल्याला जर यशस्वीपणे आपलं आयुष्य घडवायचं असेल, तर वैचारिक आणि बौद्धिक समृद्धी अनिवार्य आहे. मग वैचारिक समृद्धी कशी निर्माण करायची? तर त्यासाठी या काही गोष्टी आपल्याला नक्कीच करता येऊ शकतात.

  • रोज निदान पंधरा मिनिटं काहीतरी नवीन वाचा. त्यातून काहीतरी नवीन आत्मसात करा.

  • शिकण्याची मानसिकता (learner’s mindset) जोपासा. नवीन काहीतरी शिकण्याचं निश्चित ध्येय ठेवा.

  • विकासाभिमुख आणि दूरदर्शी विचार विकसित करा.

  • आपल्यापेक्ष्या भिन्न विचार असणाऱ्या व्यक्तींबरोबर वेळ घालवा. अशा संभाषणांमधून खूप काही नवीन शिकायला मिळतं.

  • आपली प्रगती आणि आपला उत्कर्ष आपल्या वैचारिक समृद्धतेवर अवलंबून असतो, म्हणून सकारात्मक आणि विधायक विचारांची मानसिकता ठेवून वैचारिक समृद्धी निर्माण कारण्यावर भर द्या.

2) भावनिक समृद्धी - भावनिक समृद्धी म्हणजे, स्वतःशी आणि इतरांशी आनंदमयी संबंध निर्माण करण्याची क्षमता. इतरांबरोबर भावनिक सुसंवाद साधण्याची कला. सकारात्मक भावना आपल्या मनात रुजू करणे, म्हणजे भावनिक समृद्धी. या तीन गोष्टी आपण जाणीवपूर्वक आचरणात आणतो, तेव्हा आपण भावनिक समृद्धीचा आणि आनंदाचा अनुभव घेतो. आपलं कौटुंबिक जीवन, नातेसंबंध व आपले सामाजिक अनुभव या तीनही स्तरांवरती आपण उच्च दर्जाच्या जीवनाचा अनुभव घेऊ शकतो, तेव्हाच भावनिक समृद्धी असते. भावनिक समृद्धीचा अभाव असेल, तर भौतिक समृद्धी असूनही मन आनंदी राहण्याची शाश्वती नसते. कारण मनाचा आनंद हा भौतिक सुखापेक्षा वेगळा असतो आणि हा पैलू सुखी आयुष्य जगण्यासाठी महत्त्वाचा असतो. भावनिक समृद्धी कशी निर्माण करायची?

  • आपल्या व इतरांच्या भावना समजून घेण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

  • स्वतःच्या व इतरांच्या भावनांचा आदर करा. भावना योग्यरित्या व्यक्त करण्यावर भर द्या.

  • भावनांचं व्यवस्थापन आनंदी जीवनासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे कुटुंबीयांबरोबर याबद्दल सकारात्मक चर्चा करा.

नात्यांमधील गोडवा हा प्रसन्न, आनंदी आणि समृद्ध मनातूनच निर्माण होऊ शकतो. समृद्धीच्या व्याख्येचा आपण अशा प्रकारे विस्तार करतो, आणि आर्थिक व मानसिक समृद्धीचा जागरूकपणे विचार करतो, तेव्हा खऱ्या अर्थानं परिपूर्ण जीवनाचा आपण अनुभव घेऊ शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.