Pune GBS News : पुण्यात GBS चे संकट कायम; नवे ३ संशयित रुग्ण आढळले, २८ रुग्ण व्हेंटिलेटरवर
Saam TV February 02, 2025 02:45 AM

Pune GBS News : पुण्यासह राज्यभरात जी बी सिंड्रोमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यानंतर इतर जिल्ह्यांमध्येही हा आजार पसरत आहे. दरम्यान जी बी एस वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. नागरिकांना या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासन खबरदारी घेतली जात आहे. आता पुण्यातील जी बी एस रुग्णांची नवी माहिती समोर आली आहे.

गुलियन बॅरी सिंड्रोमचे पुण्यात आत्तापर्यंत १४९ रुग्ण सापडले आहेत. यातील वीस रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात ५ संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. एकूण रुग्णांपैकी १२४ रुग्णांची जी बी एस निदान निश्चिती झाली आहे. यांपैकी २९ रुग्ण हे महापालिका तर ८२ रुग्ण हे नव्याने महापालिका अंतर्गत येणाऱ्या गावांमधील आहेत. १७ रुग्ण हे पिंपरी चिंचवड मनपा, १३ रुग्ण पुणे ग्रामीण व ८ इतर जिल्ह्यांतील आहेत.

पुण्यातील एकूण जी बी एस रुग्णांपैकी २८ रुग्ण हे व्हेंटीलेटरवर आहेत. आज ३ नवीन संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ६ रुग्ण हे मागील दिवसामधील आहेत. ही माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. आजाराची लक्षणे आढळल्यास न घाबरता रुग्णालयाशी संपर्क करण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.

जी बी सिंड्रोमची सर्वसाधारण लक्षणे -

१. अचानक पाय किंवा हात यांना कमजोरी किंवा लकवा

२. चालण्यात त्रास होणे किंवा अशक्तपणा

३. अतिसारचा जास्त दिवस त्रास होणे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.