हर्षित राणासाठी 'हा' नियम ठरला फायद्याचा, ज्यावर इंग्लंडचा संघ आहे नाराज
BBC Marathi February 02, 2025 02:45 AM
Getty Images चौथ्या टी-20 सामन्यात भारतानं इंग्लंडचा 15 धावांची पराभव केला.

हार्दिक पांड्या-शिवम दुबे यांची आक्रमक फलंदाजी आणि हर्षित राणा-रवि बिश्नोई यांची गोलंदाजी यामुळे हातातून निसटलेल्या सामन्याचं पारडं भारताच्या बाजूनं झुकलं.

पुण्यातील एमसीए स्टेडियमवर झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतानं इंग्लंडचा 15 धावांची पराभव केला.

या विजयामुळे मालिकेत भारतानं 3-1 ची विजयी आघाडी घेतली आहे. यामुळे भारत मायदेशात लागोपाठ 17 वी टी-20 मालिका जिंकणार हे निश्चित झालं आहे.

2019 पासून भारत मायदेशी कोणतीही टी-20 मालिका हरलेला नाही.

कॉनकशन नियमामुळे हर्षितचं नशीब फळफळलं

भारतीय संघाचा डाव उभा करण्यात शिवम दुबेनं महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, शिवम दुबेला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी हर्षित राणाचा संघात समावेश करण्यात आला. हा बदल 'कॉनकशन सबस्टिट्यूट नियमा'द्वारे (concussion substitute rule)करण्यात आला.

या निर्णयामुळे इंग्लंडचा संघ नाराज झालेला दिसून आला. या नियमानं इंग्लंडच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रत्यक्षात भारतीय संघाच्या डावातील शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर 53 धावांवर खेळत असलेल्या शिवम दुबेच्या हेल्मेटवर इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेमी ओवर्टनचा बाऊन्सर लागला.

त्यानंतर भारतीय डॉक्टरांच्या टीमनं शिवमची तपासणी केली आणि त्याला शेवटचा चेंडू खेळण्याची परवानगी देखील दिली. मात्र त्यानंतर मॅच रेफरीनं हर्षित राणाला शिवमच्या जागी खेळण्याची परवानगी दिली.

Getty Images शिवम दुबेनं तडाखेबंद फलंदाजी करत अर्धशतक केलं

इंग्लंडचे खेळाडू या निर्णयामुळे नाराज झालेले दिसले. त्यांचं म्हणणं होतं की शिवम दुबेच्या जागी त्याच्यासारख्याच दुसऱ्या खेळाडूला खेळण्याची संधी मिळायला हवी होती.

शिवम दुबे हा मूळात एक फलंदाज आहे आणि तो धीम्या गतीनं मध्यम तेज गोलंदाजीदेखील करतो. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये त्यानं जास्त गोलंदाजी केलेली नाही.

त्याउलट हर्षित 90 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं गोलंदाजी करतो. टी-20 मध्ये त्यानं आतापर्यंत फक्त तीन वेळाच फलंदाजी केली आहे. एकदा 10 व्या क्रमांकावर आणि दोन वेळा 11 व्या क्रमांकावर त्यानं फलंदाजी केली आहे.

हर्षितनं मिळालेल्या संधीचं सोनं करत उत्तम गोलंदाजी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने चार षटकांमध्ये 33 धावा देत 3 गडी बाद केले.

हर्षितनं लिव्हिंगस्टन आणि जेमी ओवर्टन या दोघांना बाद केलं. हे खेळाडू बाद होणं महत्त्वाचं होतं. कारण ते इंग्लंडला विजयाच्या दिशेनं नेत होते. मात्र ते बाद झाल्यामुळे इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आणि इंग्लंडच्या हातून सामना निसटला.

BBC

BBC हर्षित राणा वाट पाहत होता अशाच संधीची

हर्षित राणानं भारताच्या टी-20 संघाबरोबर काही दौरे केले आहेत. मात्र, त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 करियरची सुरुवात कॉनकशन नियमाद्वारे झाली.

सामन्यानंतर हर्षितनं समालोचकांना सांगितलं की इंग्लंडच्या डावात दोन षटकं गोलंदाजी केल्यानंतर शिवम दुबे पॅव्हेलियनमध्ये परतला आणि हर्षितला सांगण्यात आलं की, 'त्याने गोलंदाजी करायची आहे.'

हर्षित म्हणाला, "मी याच संधीची वाट पाहत होतो आणि माझी क्षमता सिद्ध करण्यासाठी सज्ज होतो. यासाठी मी फक्त याच मालिकेत नाही तर प्रदीर्घ काळापासून तयारी करत होतो. केकेआरच्या संघाकडून खेळताना जो अनुभव मला मिळाला, त्याचा फायदा झाला."

Getty Images हर्षित राणानं मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि इंग्लंडचे तीन फलंदाज बाद केले शिवम दुबे ठरला प्लेअर ऑफ द मॅच

शिवम दुबे जरी कॉनकशन नियमामुळे गोलंदाजी करू शकला नाही, तरी भारतीय संघाला इंग्लंडच्या संघाविरुद्ध लढण्याच्या स्थितीत आणण्यात त्याच्या फलंदाजीची भूमिका महत्त्वाची ठरली.

तो खेळपट्टीवर आला तोपर्यंत भारतीय संघाचे फक्त 57 धावांवर चार गडी बाद झाले होते. शिवम फलंदाजीला आल्यानंतर थोड्या वेळातच रिंकू सिंह देखील बाद झाला आणि त्यामुळे त्याच्यावरील जबाबदारी आणखी वाढली होती.

मग शिवमनं हार्दिक पांड्याबरोबर चांगली भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीसमोर इंग्लंडचे गोलंदाज निष्प्रभ झाले होते. या मालिकेत हार्दिकला पहिल्यांदा सूर गवसलेला दिसून आला. तो खूपच सहजतेनं चौकार-षटकार मारत होता.

Getty Images शिवम दुबे या सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' ठरला

त्याने 30 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 4 चौकार लगावत 53 धावा केल्या. शिवमनं देखील 7 चौकार आणि 2 षटकार ठोकत 53 धावा केल्या.

शिवम आणि हार्दिक यांनी 44 चेंडूंमध्ये 87 धावांची जबरदस्त भागीदारी केली. त्यांच्या भागीदारीमुळेच भारतीय संघाला इंग्लंडला आव्हान देण्याइतपत धावसंख्या उभारता आली. भारतीय संघानं 181 धावा केल्या.

सामन्यात एक वेळ अशी होती की भारतीय संघाचे तीन गडी फक्त 12 धावांवर बाद झाले होते. साकिब महमूदनं एकाच षटकात तीन गडी बाद केल्यामुळे भारतीय संघ गडगडला होता. अशा परिस्थितीत देखील भारतीय संघानं उभारलेल्या धावसंख्येवरून संघातील फलंदाजी किती भक्कम आहे ते दिसून येतं.

भारताला विजयाकडे नेणारा रवि बिश्नोई

बेन डकेट आणि फिल सॉल्ट यांनी ज्याप्रकारे धावा काढण्यास सुरुवात केली होती, ते पाहता इंग्लंड हा सामना सहज जिंकणार आणि मालिकेत दोन-दोन अशी बरोबरी करणार असं वाटत होतं.

या जोडीनं पहिल्या सात षटकांमध्ये कोणताही गडी बाद होऊ न देता 62 धावा केल्या होत्या. या जोडीतील डकेट तिसऱ्या सामन्याप्रमाणेच आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने 19 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 1 षटकार ठोकत 39 धावा केल्या.

रवि बिश्वोईच्या हातात चेंडू आल्यानंतर त्याने डकेट आणि नंतर जोस बटलर यांना बाद करून इंग्लंडच्या संघावर दबाव निर्माण केला.

Getty Images रवि बिश्नोईनं इंग्लंडच्या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला

दरम्यान अक्षर पटेलनं फिल सॉल्टला बाद केलं आणि त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा निर्माण झाल्या. रविनं 28 धावा देत तीन गडी बाद केले.

समालोचक पियूष चावला म्हणाले की, "या मालिकेत रवि बिश्वोईनं पहिल्यांदा चांगली गोलंदाजी केली. कारण त्याने उजव्या हाताच्या फलंदाजांना गोलंदाजी करताना चेंडूची दिशा चौथ्या यष्टीवर ठेवली."

"त्यामुळे फलंदाजांना मोकळेपणानं फटकेबाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्याचबरोबर त्याने चेंडूची दिशा आणि टप्पा योग्य प्रकारे राखत गोलंदाजी केली. त्याची गती देखील चांगली होती. त्यामुळेच त्याला यश मिळालं," असं ते पुढे म्हणाले.

पियुष चावला म्हणाले की भारतीय गोलंदाजांनी सहा ते आठ मीटरच्या दरम्यान चेंडूचा टप्पा ठेवत इंग्लंडच्या फलंदाजांना सतत अडचणीत आणलं.

इंग्लंडचा संघानं गमावली संधी

साकिब महमूदनं इंग्लंडच्या संघाला ज्याप्रकारे सुरुवातीलाच यश मिळवून दिलं होतं, ते पाहता त्या वेळेस असं वाटत होतं की भारतीय संघाला चांगली धावसंख्या उभी करता येणार नाही.

जोफ्रा आर्चरच्या पहिल्या षटकात 12 धावा काढल्या गेल्यानंतर महमूदनं दुसऱ्या षटकात विना धावा देत संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना बाद करत भारतीय संघाला अडचणीत आणलं.

मात्र सुरुवातीच्या या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेत इंग्लंडच्या गोलंदाजांना भारतीय संघाचा डाव लवकर आटोपता आला नाही.

Getty Images इंग्लंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली होती, मात्र त्यांचे फलंदाज याचा फायदा घेऊ शकले नाहीत

याचप्रकारे इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केल्यानंतर देखील नंतरच्या फलंदाजांनी केलेल्या चुकांमुळे इंग्लंडची सामन्यावरील पकड निसटत गेली. ब्रायडन कोर्स आणि हॅरी ब्रुक हे दोनच फलंदाज असं आहेत, जे इंग्लंडला सामना जिंकून देऊ शकत होते.

मात्र दोघेही चुकीच्या वेळेस मोठे फटके खेळत बाद झाले. हॅरी ब्रुकनं अर्धशतक लगावत इंग्लंडच्या संघाला विजयाच्या दिशेनं नेलं होतं. मात्र वरुण चक्रवर्तीचं हे शेवटचं षटक आहे हे माहित असून देखील तो चुकीचा शॉट खेळत बाद झाला.

याच षटकात ब्रायडन कोर्सदेखील षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यामुळे इंग्लंडच्या हातून सामना निसटत गेला. हे दोन गडी बाद केल्यामुळे वरुण चक्रवर्तीनं मालिकेत 12 गडी बाद केले आहेत.

सूर्यकुमारनं केलं हार्दिक आणि दुबेचं कौतुक

भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सामन्यानंतर म्हणाला की, "आमची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी फलंदाजीतील अनुभवाचा वापर करत चांगली खेळी केली. ही कौतुकास्पद बाब आहे."

Getty Images सूर्यकुमार यादव स्वत: शून्यावर बाद झाला आणि भारताचे फक्त 13 धावांवर तीन गडी बाद झाले होते, तर 79 धावांवर पाच गडी बाद झाले होते

सूर्यकुमार यादव म्हणाला, "आम्ही सातव्या ते दहाव्या षटकादरम्यान इंग्लंडच्या डावावर नियंत्रण मिळवलं. चहापानानंतर हर्षित राणानं ज्याप्रकारे गोलंदाजी केली, ते कौतुकास्पद आहे."

जोस बटलर म्हणाला, "गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये आम्ही चांगली सुरुवात केली होती. मात्र तरीदेखील सामना जिंकता न येणं ही खूप निराशाजनक गोष्ट आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.