अक्षय गवळी, साम टीव्ही
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तोफ डागली आहे. शेतकऱ्यांसाठी निराशाजनक बजेट असल्याचं आंबेडकरांनी म्हटलं आहे. शेतकरी, दलित आणि आदिवासींच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका आंबेडकरांनी केली. तसेच पुढील तीन ते चार महिन्यात भारताची अर्थव्यवस्था कोसळेल, असा दावाही आंबेडकरांनी केला.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात माध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'नोकरदार वर्गासाठी वाढलेली १२ लाख आयकर मर्यादा सरसकट वाढवण योग्य नाही. शेतकऱ्यांसाठी निराशाजनक बजेट आहे. शेतमाल भाव जाहीर केला जातो. मात्र त्याचा कायदा नाही. कंपन्यांना अॅग्रीकल्चर सोपवून देण्याचं काम चाललंय. बेरोजगारीला चालना मिळेल असा हा अर्थसंकल्प आहे. कारण, अमेरिकेतून येणाऱ्या 7 लाख 50 हजार लोकांची संख्या बेरोजगारीत भर देणारी असणार आहे'.
'अमेरिका आणि दुबईहून येणारी संख्या ३१ लाखांवर असणार आहे. तिही बेरोजगारीत भर देणारी ठरणार आहे. या बजेटमध्ये बेरोजगारीसाठी कुठलंच प्रयोजन नाही. रशियाचं क्रूड ऑईल भारत युक्रेनला विकत होतं. त्यामुळं भारताला बजेटसाठी सहाय्य मिळत होतं. ते आता राहिलं नाही, असे प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले.
'भारतीय अर्थव्यवस्था येत्या तीन-चार महिन्यात 'तितर बितर' होण्याची शक्यता अधिक असणार आहे. अर्थव्यवस्था कोसळून जाणार आहे. अर्थसंकल्पाचा जीडीपी आणि लोकविकासाशी काही संबंध आहे, असे मी मानत नाही. जीडीपी म्हणजे तुमची संपत्ती किती वाढली? अशीच असणार? त्यामुळं जीडीपी आणि लोकविकास याच काही नातं नाही. शेतकरी दलित आणि आदिवासी यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही आंबेडकर पुढे म्हणाले.