बदनापूर - येथील गणेशनगर भागातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन एका २५ वर्षीय पदवीधर तरुणीने शनिवारी (ता. एक) दुपारी चार वाजता आत्महत्या केली आहे. आरक्षण नसल्याने उच्चशिक्षित असून देखील शासकीय नोकरी मिळत नसल्याने तिने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती मुलीचे नातेवाईक तथा खादगाव (ता. बदनापूर) येथील सरपंच सोपान नाईकवाडे यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राणी साहेबराव नाईकवाडे (रा. खादगाव, हल्ली मुक्काम गणेशनगर, बदनापूर) असे आत्महत्याग्रस्त मुलीचे नाव आहे. ती विज्ञान शाखेची पदवीधर आहे. शिवाय तिने स्पर्धा परीक्षा देखील दिल्या होत्या.
मात्र उच्चशिक्षित असून देखील केवळ आरक्षण नसल्याने शासकीय नोकरी मिळत नाही, या विवंचनेत तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती सरपंच नाईकवाडे यांनी दिली.
तर शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा नोकऱ्या मिळत नसल्याने समाजातील उच्चशिक्षित तरुण आणि तरुणी टोकाचे पाऊल उचलत असल्याची भावना अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप ताडगे यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली. दरम्यान, मृत राणी नाईकवाडे हिच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे.