Ashok Dhodi kidnap Case : भावानं काढला भावाचा दृश्यम स्टाईल काटा; फिल्मीस्टाईल हत्येचं 12 दिवसांनंतर उलगडलं गूढ, VIDEO
Saam TV February 02, 2025 04:45 AM

अजय देवगण, तब्बूचा गाजलेल्या दृश्यम या थ्रिलर, सस्पेन्स सिनेमाची आठवण यावी असा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडींची हत्या त्यांच्या भावानंच केल्याचं उघड झालंय. या क्रूर, चलाख भावानं अगदी दृश्यम स्टाईल काटा काढला आहे.

20 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या यांचा शोध घेण्यात पालघर पोलिसांना 12 दिवसानंतर यश आलं. मुंबईतून घरी परतत असताना अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी यानं अपहरण केलं आणि हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठलं. गुजरातच्या भिलाड परिसरातल्या ४० फूट खोल पाण्यानं भरलेल्या दगडाच्या खदानीत कारसह अशोक धोडींचा मतृदेह ढकलून दिला.

'पकडलेल्या आरोपींनी खदाणीची माहिती दिली, अशी माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. आरोपी अविनाश धोडीचा दारू तस्करीचा धंदा होता. या धंद्यात भाऊ अशोक अडचणीचा ठरत होता. म्हणूनच अविनाशनं भावाची हत्या केली. या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी अविनाश धोडी याच्यासह आणखीन तीन आरोपी फरार आहेत.

त्यामुळे फरार आरोपींपासून जीवाला धोका असल्याची भीती अशोक धोडींचा मुलगा आकाश यांनं व्यक्त केलीय. दृश्यमस्टाईल आपल्या भावाला संपवल्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. मात्र संपत्तीसाठी जीवावर उठल्यामुळे भावाच्या नात्यालाच काळीमा फासला गेलाय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.