पूजा खेडकरचे पाय आणखी खोलात! पालकांच्या संपत्तीची मागवली माहिती; नगर जिल्हा प्रशासनाचे नोंदणी म
Marathi February 02, 2025 01:24 PM

पुणे: केंद्र सरकारकडून फसवणुक आणि इतर खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या पदावरून पूजा दिलीप खेडकर (Puja Khedkar)यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. चुकीच्या पद्धतीनं दिव्यांग आणि ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेत पूजा खेडकर (Puja Khedkar) यांनी भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2023 च्या बॅचमध्ये स्थान मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान त्यांच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करून आयएएस पदाचा लाभ मिळवणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांच्या वडील आणि आई यांच्या नावावरती असलेल्या मालमत्तांची माहिती द्यावी, अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांकडे केली आहे.

पूजा खेडकरांच्या आई वडीलांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची एकत्रित माहिती गोळा करून प्रशासनाची समिती उत्पन्नाची मर्यादा ठरवणार आहे. खेडकर यांच्या मालमत्तांची चौकशी हा प्राप्तिकर विभागाच्या चौकशीचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचे उत्पन्न कोटींमध्ये असतानाही त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले, असा सवाल उपस्थित झाल्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. पूजा खेडकर यांनी पुण्यातील  काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून एनटी 3 या संवर्गातून प्रवेश मिळवला होता. त्यावेळी त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रही जोडल्याचे स्पष्ट झाले होते. दिलीप खेडकर हे त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते. त्यामुळे 2007 मध्ये त्यांचे उत्पन्न 4 लाखांपेक्षा कमी कसे असेल, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता.

खेडकरांकडे 40 कोटी रुपये संपत्ती असल्याचे जाहीर

पूजा खेडकर यांनी 2023 मध्ये यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर ओबीसी संवर्गातून तसेच दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून आयएएसची श्रेणी मिळवली होती. त्यासाठी त्यांनी पुन्हा नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडले होते. त्यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी 40 कोटी रुपये संपत्ती असल्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर पूजा यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसं मिळालं, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानुसार दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या नावावरील मालमत्तांची एकत्रित माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे पत्र अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांत याची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा प्रशासनाला प्राथमिक तपासात खेडकरांचे उत्पन्न नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्याप्रमाणे त्यांनी उत्पन्नातून किती मालमत्ता खरेदी केल्या, याचीही मोजणी करून एकूण उत्पन्न काढण्यात येणार आहे. यातून उत्पन्नाची वार्षिक मर्यादा ठरवण्यात येणार आहे. ही मर्यादा ठरवण्यासाठी विभागीय व जिल्हास्तरावरील समिती अभ्यास करणार आहे असल्याची माहिती आहे.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.