हदगाव (नांदेड) दि. २ : पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली आहे, उर्वरित ठिकाणी लवकरच कामे सुरु होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
नांदेड जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हदगाव येथील श्री गुरुवर्य बापूनगर परिसरातील श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व व कलशारोहण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते उपस्थित होते. मराठवाडा, विदर्भ व महाराष्ट्रातील ठीक ठिकाणच्या महानुभाव पंथाच्या मठाधिपतींसह हजारोच्या संख्येने महानुभवपंथीय या सोहळ्याला उपस्थित होते.
वैराग्यमूर्ती मठाधिपती महंत श्री योगी बापू यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर माहूर पिठाधीश कवीश्वराचार्य माहुरकर बाबा यांच्यासह परिसरातील मठाधिपती धर्मपीठावर विराजमान होते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या या मठाधिपतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महानुभाव पंथीयांसाठी केलेल्या कार्यकर्तृत्वाला लक्षात घेऊन स्तुती सुमनांनी साकारलेले सन्मानपत्र बहाल केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्वप्रथम चक्रधर स्वामींना दंडवत घातला. त्यानंतर धर्मपीठावरून बोलताना सर्वज्ञ चक्रधर स्वामी व त्यांच्या अनुयायांनी अतिशय विपरित परिस्थितीत धर्म रक्षणाचे कार्य केल्याचे स्मरण केले. महानुभव पंथीयांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांनी गौरव केला. परकीय आक्रमणामुळे कृष्णदेवाची पूजा करून घेणे, हिंदू म्हणवून घेणे कठीण होते. त्या काळात चक्रधर स्वामीनी जातीपाती, पंथाचा विचार न करता महानुभव दाखवला, समरसता व समतायुक्त समाज त्याकाळी देशात निर्माण केला.
महाराष्ट्र शासनाने राज्यभरात आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी महानुभाव पंथीयांचे मंदिर आहेत त्या मंदिरांचा विकास करण्याचे काम केल्याचे सांगितले. रिद्धपुरचा पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंदप्रभू देवस्थान अशा अनेक ठिकाणी संवर्धनाचे काम सुरु आहे, यापुढेही हे कार्य सुरू राहील,असे आश्वस्त केले.
तसेच या स्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी चर्चेतून मार्ग काढून येथील विकास कामे केली जातील. चांगल्या कामांसाठी राज्य सरकार ताकदीने पाठिशी उभे राहील, असे सांगितले.
यावेळी त्यांनी महानुभावपंथीयांच्या ग्रंथ प्रेमाची, धर्म साहित्य निर्मितीच्या चिकाटीचे कौतुक केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, राजमान्यता मिळाली. यामध्ये महानुभाव साहित्याचा मोठा वाटा आहे. आपण जे पुरावे दिले आणि जे स्वीकारले गेले. यातील एक महत्वाचा पुरावा लीळाचरित्र होते.
मराठी भाषा किती प्राचीन याचा पुरावा यानिमित्ताने देता आला. लीळाचरित्र ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेला, त्या रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठाचा विकास पुढील टप्यात करण्यात येणार आहे. महानुभाव पंथाच्या माध्यमातून मराठी भाषा विद्यापीठाचा उपयोग करून आपले साहित्य, विचार,अध्यात्म जगभरामध्ये पोहोचवण्याचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
देशाच्या कानाकोपऱ्यात नाही तर अफगाणिस्तानपर्यंत महानुभव पंथ पोहोचला आहे. आज इतका मोठा संप्रदाय आपल्याला समतेच्या अधिष्ठानावर काम करताना दिसतो. आज या धर्मपीठावर या स्थानावर इतकी मोठी महंत मंडळी येऊन गेली. ही परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे, असे त्यांनी धर्मपीठावरील सर्व मान्यवरांना अभिवादन करताना स्पष्ट केले.
तत्पूर्वी, त्यांनी आगमन झाल्यानंतर जीर्णोद्धार करण्यात आलेल्या उखळाई माय मंदिरात जाऊन मायचे विडाअवसर (दर्शन घेतले) केले. आजच या ठिकाणी संत महात्म्यांच्या उपस्थितीत कलशारोहण झाले. हे मंदिर पाचशे वर्षापूर्वीचे असल्याची मान्यता आहे. यावेळी त्यांनी श्रीकृष्ण मूर्तीचे भक्तार्पण केले.
कार्यक्रमाचे आयोजक वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचा त्यांनी सत्कार केला. भक्तांना प्रातिनिधिक सेवा पुरस्कार बहाल केला.
या कार्यक्रमाला हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, बाळासाहेब ठाकरे हरीद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, आमदार भीमराव केराम, आमदार आनंद पाटील बोंढारकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर,आमदार बालाजी कल्याणकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार सुरेखा नांदे, आदीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या महानुभव पंथाचे पिठाधीश व अन्य मान्यवर उपस्थित होते.
०००
The post first appeared on .