मुंबई : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. यात काँग्रेसला सर्वाधिक मोठा फटका बसला. कारण 100 हून अधिक जागा लढलेल्या काँग्रेसला केवळ 16 जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेतेमंडळी नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशात नाना पटोले यांनी काँग्रेसकडून दणका देण्यात आला आहे. नाना पटोले यांच्याकडून नियुक्त केलेल्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीला काँग्रेसकडून स्थगिती देण्यात आली आहे. खरतर, नाना पटोलेंच्या निर्णयला काँग्रेस स्थगिती देण्याची पहिलीच वेळ नाही तर, याआधीही 2023 काँग्रेसने नाना पटोलेंच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. (congress cancels district president appointments from nana patole)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून नांदेड, नवी मुंबईतील जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी नाना पटोलेंनी केलेल्या नांदेड आणि नवी मुंबईतील नियुक्त्यांना स्थगिती देत रद्द केल्या आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताना काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी पक्षातील दोन नानांपैकी एका नानानं 4 कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. दरम्यान, रमाकांत म्हात्रे यांच्या याच आरोपाची दखल घेत रमेश चेन्निथला यांनी नाना पटोलेंनी केलेल्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे.
याशिवाय, नाना पटोले यांनी नांदेड आणि नवी मुंबईतील जल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करताना ऑल इंडिया कमिटीची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे नियुक्तीला स्थगिती देण्याचा निर्णय चेन्निथला यांनी घेतला. मात्र, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर काँग्रेस आणि नाना पटोले यांच्यात जुळतंय का, असा उपस्थित होत आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या गोटात काही आलबेल नसल्याचंही बोललं जात आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवलं होतं. 2023 साली झालेल्या चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय वडेट्टीवार आणि भाजपच्या पॅनलने हातमिळवणी करत खासदार बाळू धानोरकर यांच्या पॅनेलचा पराभव केला होता. त्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली होती. मात्र त्यावेळी नाना पटोले यांनी केलेल्या कारवाईला काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडून स्थगिती देण्यात आली होती.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अपयशाची जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. त्यावर नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या नियुक्तीचा निर्णय अद्याप झालेला नाही. विशेष म्हणजे, नाना पटोले हे पैसे घेऊन पदवाटप करत असल्याचा आरोप नवी मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमाकांत म्हात्रे यांनी केला होता. हा आरोप करतानाच त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या आरोपांमुळे काँग्रेस आता अलर्ट मोडवर आली असून आता आगामी काळात कोणते निर्णय काँग्रेस घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.