Education Fraud : मान्यता नसताना विद्यार्थ्यांना नरसिंग डिप्लोमाला प्रवेश, फसवणूक प्रकरणी संस्थाचालक शंकर बाबरेना अटक
esakal February 03, 2025 03:45 AM

देगलूर : शासनाची मान्यता नसताना शहरातील मोंढा कॉर्नर भागात समृद्धी कॉलेज ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल सायन्स या नावाने संस्था काढून विद्यार्थ्यांना सन २०२१: २०२२ पासून प्रवेश दिला, त्यांच्याकडून प्रशिक्षण फी ही आकारली गेली. मात्र विद्यार्थ्यांची परीक्षां च घेतली गेली नाही. परीक्षा न घेण्याचे कारण विद्यार्थ्यांनी संस्थाचालकास वेळोवेळी विचारून सुद्धा त्यांनी वेळ मारून नेली. आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी या कॉलेजच्या बोगसगिरीचा भांडाफोड करायला सुरुवात केली . त्यांनी प्रशासनाला गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच यासंबंधीचे एक निवेदन दिले होते .अखेर रविवारी ता.दोन रोजी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून संस्थाचालक शंकर बाबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याची रवानगी कोठडीत केली आहे.

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात नर्सिंग कॉलेजच्या नावाखाली गेल्या चार वर्षापासून समृद्धी कॉलेज ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल सायन्स या कॉलेजच्या नावाने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले व त्यांच्याकडून शैक्षणिक फी आकारली गेली मात्र त्यांची परीक्षाच घेतली गेली नाही परीक्षेच्या नावाखाली त्यांना कर्नाटकातील बिदर ,बेंगलोर ,हुमनाबाद येथे नेण्यात आले मात्र तांत्रिक कारण सांगुन परीक्षेसंदर्भात उडवाउडवी चे उत्तरे दिली गेली.

आपली फसवणूक झाल्याची बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लेखी तक्रार पोलीसांकडे केली होती. यासंबंधीचे वृत्त दैनिक सकाळने.ता. १ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्धीस दिले होते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उपजिल्हाधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदनादद्वारे या बोगसगिरी चा भांडाफोड केला होता.

पण संस्थाचालकास पाठीशी घालण्याचे प्रयत्न सर्वच पातळीवर झाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नव्हता. माध्यमातून यासंबंधीचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पोलिसांनी अखेर संस्थाचालक शंकर बाबरे यांच्या विरोधात विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी रविवारी ता. २ रोजी गुन्हा दाखल करून त्यास .न्यायालयासमोर उभे केले .न्यायालयाने त्यास येत्या ता. ७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्री नरहरी फड हे करीत असल्याचे सांगण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.