Maharashtra Kesari Prithviraj Mohol: पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी! महेंद्र गायकवाडनं का सोडलं अचानक मैदान?
esakal February 03, 2025 03:45 AM

पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने 67 वा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. अंतिम फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत करत मोहोळने कुस्ती क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले. शिवराज राक्षेच्या वादग्रस्त वर्तणुकीमुळे स्पर्धा गाजली, तर विजयानंतर समर्थकांनी जल्लोष केला.

अहिल्यानगरमध्ये रंगलेल्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने उत्कृष्ट कामगिरी करत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला. या विजयासह मोहोळने 67 वा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आणि कुस्ती क्षेत्रात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. या विजयाने त्याच्या कुटुंबाचे आणि प्रशिक्षकांचे स्वप्न साकारले, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

मोहोळच्या कुशाग्र डावपेचांसमोर गायकवाडचा पराभव

पृथ्वीराज मोहोळ हा गादी गटातून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता, तर महेंद्र गायकवाड माती गटातून अंतिम फेरीत पोहोचला. दोन्ही कुस्तीपटूंमध्ये तीव्र चुरस पाहायला मिळाली. सामना सुरू होताच मोहोळने पहिला पॉईंट मिळवून आघाडी घेतली, मात्र काही वेळातच गायकवाडनेही पॉईंट मिळवून बरोबरी साधली.

यानंतर मोहोळने जोरदार आक्रमण करत आणखी एक पॉईंट मिळवला, मात्र याच क्षणी काहीसा गोंधळ उडाला आणि गायकवाडने मैदान सोडले. पंचांनी पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी घोषित केले.

पृथ्वीराज मोहोळ हा मुळशी तालुक्यातील मोठा गावचा रहिवासी असून तो खालकर तालीम येथे कुस्तीचा सराव करत आहे. त्याने यापूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी कुस्त्या लढवून आपले कौशल्य सिद्ध केले आहे.

शिवराज राक्षेचा वाद आणि स्पर्धेतील गोंधळ

स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात एका मोठ्या वादाला तोंड फुटले. कुस्तीपटू शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारल्याचा प्रकार घडला, ज्यामुळे स्पर्धेचे आयोजन चर्चेत आले. या घटनेमुळे स्पर्धेचे वातावरण काही काळ तणावग्रस्त झाले, मात्र संयोजकांनी योग्य ती कारवाई करत सामना पूर्ववत केला.

अजित पवार यांच्या हस्ते सन्मान आणि बक्षीस वितरण

पृथ्वीराज मोहोळच्या भव्य विजयानंतर राज्याचे यांच्या हस्ते त्याला महाराष्ट्र केसरी किताब बहाल करण्यात आला. यावेळी त्याला चांदीची गदा आणि थार गाडी पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

मोहोळच्या समर्थकांचा जल्लोष

विजयानंतर मोहोळच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. कुस्ती क्षेत्रात नव्या दमाच्या पैलवानाने महाराष्ट्र केसरी जिंकून पुण्याच्या कुस्ती संस्कृतीचा लौकिक वाढवला, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

प्रेक्षकांमध्ये उत्साह, पण काही गोंधळही

अंतिम सामना पाहण्यासाठी अहिल्यानगरच्या मैदानात हजारो प्रेक्षक उपस्थित होते. सामना रंगतदार होत असतानाच काही प्रेक्षकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.