Kumbh Mela 2025 Stampede: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या मेळ्यात चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, आता या प्रकरणी समाजवादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. प्रशासकीय बेजबाबदारपणामुळे ही घटना घडलीय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देखरेखीखाली पूल उभारले गेले ते बंद करण्यात आले. फक्त आखाडा आणि व्हीव्हीआयपींना रिकामे ठेवले गेले. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप खासदार यादव यांनी केला.
प्रत्यक्षदर्शींचा दाखला देताना रामगोपाल यादव म्हणाले की, हजारो लोकांचा इथं मृत्यू झालाय. काही लोकांचे मृतदेह गंगेत सोडून देण्यात आले. तर काही लोकांचे मृतदेह गाडण्यात आले आहेत. संख्या ३० पेक्षा जास्त होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते.
रामगोपाल यादव म्हणाले की, ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह दिले गेले नाही. पोस्टमार्टम केलं जात नाहीय. १५ ते २० हजार रुपये देऊन पैसे घ्या आणि घरी जा असं सांगितलं जात आहे. हे कुठेही समोर येऊ नये, आकडा वाढू नये यासाठी प्रयत्न होत आहे. इतका गंभीर बेजबाबदारपणा झाला असूनही कोणत्याच अधिकाऱ्यावर कारवाई केली गेली नाही. याला कुणालाच जबाबदार धरलं गेलं नाही असंही सपा खासदार म्हणाले.