'3 इडियट्स' या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. यातील कलाकार, कथा, संवाद, गाणी सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. बॉलिवूड आणि आमिर खानच्या करिअरमधला मैलाचा दगड म्हणजे हा चित्रपट. मात्र या चित्रपटासाठी आधी मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरची निवड झालेली हे तुम्हाला ठाऊक आहे का?
'3 इडियट्स' या चित्रपटात अभिनेता आमिर खान, आर माधवन, शरमन जोशी, करीना कपूर, मोना सिंह या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. मात्र या चित्रपटातील करीनाच्या भूमिकेसाठी आधी मराठमोळी अभिनेत्री हिची निवड झाली होती. तर शरमनच्या भूमिकेसाठी अभिनेता जितेंद्र जोशी याची निवड झाली होती. मग नेमकी माशी कुठे शिंकली हे लोकप्रिय दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांनी सांगितलंय.
रोहन यांनी नुकतीच सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणेला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना रोहन म्हणाले, 'खरं सांगू तर तेव्हा सगळे ऑडिशनला येऊन गेलेले जे आताचे स्टार्स आहेत. अनुष्का शर्मा, राजकुमार राव, जॅकलिन फर्नांडिस, गुरमीत चौधरी, पुलकित सम्राट आपली अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी. जे आता सगळे स्टार आहेत ते सगळे ऑडिशनसाठी येऊन गेलेलं. आश्चर्य वाटेल, कुणाला माहिती नसेल पण सरप्रायझिंगली करीना कपूरच्या आधी अमृता खानविलकर लॉक झालेली.
ते पुढे म्हणाले, 'ती ऑलमोस्ट लॉक होती. म्हणजे तिला आठवत असेल, हा किस्सा ती कधी ऐकेल तर तेव्हा तिला आठवेल की त्यावेळेस मी पैशांसाठीही तिला कॉल केलेला, की अरे तू एका चित्रपटासाठी किती पैसे घेते. शरमनच्या रोलसाठी जितेंद्र जोशी लॉक झालेला. पण तेव्हा दुसऱ्या कलाकारांसोबतही बोलणं सुरू होतं हे आम्हाला माहीत नव्हतं. सगळ्यात पहिलं या चित्रपटात शाहरुख खान असणार होते. तेव्हा ही फिल्म सिक्कीम बेस होती.