अभिजीत देशमुख, साम टीव्ही
कल्याण : कल्याण डोंबिवलीमधील पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. बांगलादेशी नागरिक ग्रामीण परिसरासह शहरी भागातील चाळ परिसरात भाड्याने घर घेऊन राहत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ग्रामीण परिसरातील चाळमालक आणि घरमालकांची बैठक घेतली आहे. या बैठकीत घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्यात यावी. एखादा भाडेकरू बांगलादेशी असल्याचे लक्षात येताच तत्काळ याबाबत पोलिसांचे संपर्क साधावा. अन्यथा भाड्याच्या घरांमध्ये बांगलादेशी नागरिक किंवा देशासाठी घातक कृत्य करणारा कोणी आढळला तर त्या घरमालकांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराच पोलिसांनी दिला आहे.
बेकायदेशीररित्या भारतात घुसखोरी करून संपूर्ण देशभरात बांगलादेशी नागरिक आपले बस्तान मांडत आहेत. या बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कल्याण डोंबिवलीत बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. हे बांगलादेशी नागरिक हॉटेल, बार, लॉजिंग बोर्डिंग, बांधकाम साइट्स, लेबर कॉन्ट्रॅक्टर काय काम करत असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी संबंधितांना नोटीसा पाठवून कामगारांची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश दिलेत.
तर त्यानंतर बांगलादेशी नागरिक कल्याण चाळ परिसरात भाड्याने घर घेत वास्तव्य करून राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. भाड्याच्या अमिषापोटी घरमालक देखील कोणतीही विचारपूस न करता या नागरिकांना घर भाड्याने देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी कल्याण डोंबिवली परिसरातील खडेगोलवलीसह ग्रामीण परिसरातील गावांमधील घरमालकांची चाळमालकांची बैठक घेतली.
या बैठकीत घर भाड्याने देताना संबंधित भाडेकरूंची माहिती, तपशील स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावा. आपल्याजवळ घर भाड्याने घेण्यासाठी येणारा बांगलादेशी किंवा देशासाठी घातक काम करू शकतो, असा संशय आल्यास तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं. तसेच घरमालकाने ही माहिती दिली नाही, तर त्या घरमालकांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.