मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारचा अर्थंसंकल्प सादर केला. त्यानंतर आता मुंबई महापालिका मंगळवारी म्हणजे ४ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे पालिका मुख्यालयात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुंबई महापालिकेने मागील वर्षी ५९,९९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलं होतं. त्यानंतर यंदा ६५ हजार कोटींहून अधिक रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या ४ महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे साऱ्यांच्या नजरा मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याची चर्चा आहे.
एकीकडे मुंबई महापालिकेच्या ठेवीची रक्कम सातत्याने कमी होती आहे. २०२२ साली मुंबई महापालिकचे फिक्स्ट डिपॉजिट ९१ हजार कोटी रुपये होते. त्यानंतर या ठेवीची घट होऊन ८० हजार कोटी रुपये झाली आहे. मालमत्ता करात सूट दिल्याने मुंबई महापालिकेचं नुकसान होतं. आयुक्त गगराणी यांच्यासमोर मुंबई पालिकेसमोर अतिरिक्त उत्पन्न वाढवण्याचे आव्हान असणार आहे. या अर्थसंकल्पात मालमत्ता कर, रस्ते दुरुस्ती , बेस्ट बस सुविधेवर विशेष लक्ष दिलं जाण्याची शक्यता आहे. यंदा पालिका मुंबईकरांवर कराचा बोजा कमी लादण्याची शक्यता आहे.
पालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी हे शिक्षण खात्याचा अर्थसंकल्पीय अंदाज आयुक्त गगराणी यांना सादर करतील. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर हे मुंबई महानगरपालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाज गगराणी यांना सादर करतील.
दरम्यान, पालिका आयुक्त गगराणी यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. ते मंगळवारी दुपारी १ वाजता पालिका आयक्तांच्या दालनालगतच्या सभागृहात पत्रकार परिषद घेणार आहेत.