Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींच्या फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार? 1500 की 2100 रुपये? महत्त्वाची माहिती समोर!
esakal February 04, 2025 04:45 PM

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. जानेवारी महिन्याचा हप्ता याआधीच देण्यात आला असून, आता फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट सर्वजणी पाहत आहेत. हा हप्ता नेमका कधी येणार आणि तो १,५०० रुपये असेल की २,१०० रुपये, याबाबत मोठी उत्सुकता आहे.

२० दिवसांत पैसे येण्याची शक्यता-

योजनेच्या फेब्रुवारी हप्त्याबाबत अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कोणत्याही दिवशी हा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असल्याने २० तारखेपर्यंत हप्ता मिळू शकतो, असे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून हप्ता शेवटच्या आठवड्यातच जमा केला जात आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातही २५ ते २८ तारखेच्या दरम्यान पैसे येण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

१५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार का?

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या मदतीचा रकमेचा वाढवून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही. या वाढीबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा सुरू आहे.

योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असून, सरकारकडून लाभार्थ्यांची नावे पडताळणी प्रक्रियेअंतर्गत तपासली जात आहेत. त्यामुळे लाडकी बहिणींसाठी पुढील महिन्यांमध्ये काही महत्त्वाच्या बदलांची शक्यता नाकारता येत नाही.

अपात्र महिलांचे अर्ज माघारी, हजारो अर्ज रद्द

या योजनेसाठी मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केला होता. मात्र, योजनेच्या नियमांनुसार काही महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जातील अशी चर्चा रंगली होती. यामुळे अनेक महिलांनी स्वतःहून अर्ज माघारी घेतले आहेत.

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी अपात्र महिलांनी आपले अर्ज माघारी घ्यावेत, असे आवाहन केले होते. त्यानंतर हजारो महिलांनी अर्ज मागे घेतले आहेत. सध्या तील पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, या योजनेत अधिक पारदर्शकता ठेवण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे.

लाडकी बहीण योजनेचा उद्देश आणि महत्त्व

ही योजना राज्यातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांना कुटुंबासाठी हातभार लावता येईल. योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत असल्याने त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे.

सरकारकडून अधिकृत घोषणा कधी होणार?

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होईल, यासंदर्भात सरकारकडून लवकरच अधिकृत माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय, हप्त्याची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याच्या निर्णयाबाबतही येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांचे या घोषणेवर लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.