महाकुंभ नगर : सर्वांगावर भस्म धारण केलेल्या आणि हातात विविध आयुधे, दंड व ध्वज घेतलेल्या विविध आखाड्यांच्या नागा साधूंनी हरहर महादेवच्या जयघोषात सोमवारी वसंत पंचमीनिमित्त पहाटे येथील त्रिवेणी संगमावर तिसरे अमृत स्नान केले.
२९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येदिवशी अमृतस्नानादरम्यान निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी प्रशासनाने यावेळी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. वसंत पंचमीच्या अमृतस्नानावेळी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी त्रिवेणी संगमावरच गर्दी न करता प्रयागराजमधील अन्य घाटांवर अमृत स्नान करावे असे आवाहनही करण्यात आले होते.
त्यानुसार आज प्रयागराजमधील अन्य घाटांवरही मोठ्या संख्येने भाविकांनी अमृत स्नान केले. त्रिवेणी संगम परिसरात अतिरिक्त सुरक्षाही तैनात करण्यात आली असून, येथील सर्व परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पहाटे साडे तीन वाजल्यापासून येथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत,’’ अशी माहिती पोलिस उपमहानिरीक्षक वैभव कृष्ण यांनी दिली. सोमवारी दुपारपर्यंत दोन कोटीहून अधिक भाविकांनी अमृत स्नान केल्याचा प्रशासनाने सांगितले.
कोणत्याही आखाड्याची गैरसोय होऊ नये तसेच संगमावर एकाचवेळी गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक आखाड्याच्या साधूंना सुमारे ४० मिनिटांचा वेळ ठरून देण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
‘त्या घटनेचा राजकीय लाभ घेऊ नका’मौ नी अमावस्ये दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचा राजकीय लाभ घेऊ नका. स्वतःच्या स्वार्थासाठी सनातन धर्माचा गैरफायदा घेणे बंद करा, असे आवाहन येथील विविध आखाड्यांच्या साधूंनी राजकारण्यांना केले आहे.
पंच निर्वाणी आखाड्याचे महंत संतोष दास सत्तुआ बाबा महाराज यांनी, महाकुंभनगरात गैरव्यवस्थापन झाल्याच्या खोट्या अफवा पसरविणे थांबवावे, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे कुंभमेळ्यातील व्यवस्थेसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करत, महंत संतोष दास यांनी त्यांची पाठराखणही केली आहे.