आटपाडीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा काढल्याने तणावपूर्ण शांतता; रामदास आठवलेंनी आंबेडकरप्रेमींना केले 'हे' आवाहन
esakal February 04, 2025 04:45 PM

आटपाडीत गेली दोन दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सांगोला चौकात उभारण्यावरून आणि प्रशासनाने तो काढल्याने तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

आटपाडी : ‘‘राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रशस्त पुतळा सुरक्षित ठिकाणी उभारण्यासाठी जागेची मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आंबेडकर नगरमध्ये यांचा पुतळा (Dr. Babasaheb Ambedkar Statue) उभा राहील. त्यामुळे आंबेडकरप्रेमींनी शांतता राखावी,’’ असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे.

आटपाडीत गेली दोन दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सांगोला चौकात उभारण्यावरून आणि प्रशासनाने तो काढल्याने तणावपूर्ण शांतता पसरली आहे. प्रशासनाने पुतळा काढल्यानंतर संतप्त आंबेडकर प्रेमींनी पोलिस ठाण्यावर (Atpadi Police Station) मोर्चा काढून पोलिस ठाण्यात घुसून आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच दुसरा नवीन पुतळा सांगोला चौकात बसवला.

याप्रकरणी ४७ जणांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तणावात आणखी भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्याशी संपर्क साधून आढावा घेतला. यावेळी त्यांनी आंबेडकर प्रेमींना शांतता राखण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले, ‘‘आटपाडीतील पुतळा प्रकरणाची माहिती घेतली आहे. आटपाडीत आंबेडकर नगरमध्ये डॉ. आंबेडकरांचा पुतळा असलाच पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करत आहे.’’ ‘‘आंबेडकर नगरमध्ये डॉ. आंबेडकरांचा सुरक्षित ठिकाणी पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने जागा द्यावी. तशी जागेची मागणी करणार आहे. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांची भेट घेणार आहे. राज्य सरकारने सुरक्षित ठिकाणी काढलेला पुतळा पुन्हा सन्मानाने बसवावा, अशी मागणी आहे. आंबेडकरप्रेमींनी शांतता राखावी. कोणत्याही परिस्थितीत प्रशस्त डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारला जाईल,’’ असे सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.