पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात, लोकसभेत घेतला विरोधकांचा खरपूर समाचार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘जनतेचा पैसा जनतेलाच मिळाला पाहिजे, हे आमचे धोरण आहे. गेल्या 10 वर्षांमधील आमच्या अनेक धोरणांमुळे देशाचे लाखो कोटी रुपये वाचले आहेत. मात्र, आम्ही कधीच जनतेच्या पैशातून आमच्यासाठी ‘शीशमहाल’ बांधले नाहीत. दिल्लीतून सुटलेला प्रत्येक पैसा वाटेत कोणतीही काटछाट न होता, थेट गोरगरीबांच्या बँक खात्यांमध्ये जमा होईल, अशी व्यवस्था आम्ही केली आहे. त्यामुळेच आम्ही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलो आहोत‘ असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मंगळवारी ते लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावरील चर्चेचा समारोप करीत होते. आपल्या दीड तासांच्या भाषणात त्यांनी विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला चपखल प्रत्युत्तर देतानाच, गेल्या 10 हून अधिक वर्षांमध्ये केंद्र सरकारने केलेल्या जनहिताच्या कामांचाही व्यापक आढावा घेतला. आमच्या सरकारचा कामांचा धडाका पाहून विरोधकांना नैराश्याने घेरले आहे. त्यामुळे ते बेताल बोलत आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली.
सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केंद्र सरकारवर बरेच आरोप केले होते. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली होती. या सर्व आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात सडेतोड उत्तर दिले आहे. विरोधकांच्या निष्क्रीयतेवरही त्यांनी मर्मभेदी आघात त्यांनी केला. घटना खिशात बाळगणाऱ्या लोकांनी घटना समजून घेण्याची आवश्यकता आहे, असा टोला त्यांनी लगावला.
चाळीस-पन्नास वर्षे गेली वाया
स्वातंत्र्यानंतर त्वरित जे करावयास हवे होते, ते आम्ही आज करत आहोत. त्यामुळे प्रारंभीची चार ते पाच दशके अक्षरश: वाया गेली आहेत. परिणामी आम्ही प्रगत जगाच्या 50 वर्षे मागे पडलो होतो. तथापि, 2014 मध्ये आमच्या हाती सत्ता आल्यानंतर आम्ही हा ख•ा भरुन काढण्याचा प्रयत्न निष्ठेने आणि कष्टपूर्वक केला. आमच्या प्रयत्नांची फळे आज मिळत आहेत. भविष्यकाळातही ती आणखी मोठ्या प्रमाणात मिळतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
लांगूलचालनावर आघात
अनेक राजकीय पक्ष राजकीय सत्तास्वार्थासाठी विशिष्ट समाजघटकांचे तुष्टीकरण किंवा लांगूलचालन करण्यात धन्यता मानतात. या तुष्टीकरणाचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागले आहेत. आम्ही कोणाचेही तुष्टीकरण न करता सर्व समाजघटकांना लाभ मिळवून दिला आहे. सर्वांच्या सहकार्याने आम्ही देश प्रगतीपथावर नेला आहे, अशा अर्थाचे प्रतिपादनही त्यांनी भाषणात केले.
अनेक कामांचा उल्लेख
गरीबांसाठी 4 कोटी घरांची निर्मिती, ग्रामीण भागांमधील महिलांसाठी 12 कोटी स्वच्छतागृहांचे निर्माणकार्य, हजारो किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती, स्वातंत्र्यानंतर आजवर दुर्लक्षित ठेवला गेलेला ईशान्य भारताचा विकास, सरकारी योजनांचा गरीब लोकांना थेट लाभ मिळण्यासाठी साकारलेली जनधन योजना, खेडोपाडी पोहचविण्यात आलेली पेयजल योजना, दहा वर्षांमध्ये दुपटीहून अधिक प्रमाणात वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती, या महाविद्यालयांमधून वाढविलेल्या विद्यार्थ्यांच्या जागा, देशाची संरक्षण सिद्धता, आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेली दमदार पावले, अशी मोठी कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. देशाला विकसीत राष्ट्र बनविण्याचे आमचे ध्येय असून ते पूर्ण करण्याच्या दिशेने आमची जोमदार वाटचाल होत आहे. विरोधकांनी नकारात्मकता सोडून या धोरणांकडे पाहिले पाहिजे. कारण हा कोणत्या पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न नसून तो साऱ्या देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे, ही जाणीव ठेवा, अशीही सूचना त्यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना उद्देशून आपल्या भाषणात केली.
काँग्रेसला चिमटे
आज काही पक्षांना दलित, अन्य मागासवर्गिय आदी समाजघटकांचा अचानक कळवळा आला आहे. पण त्यांनी आम्हाला सांगावे, की त्यांच्या पक्षात एकाच कुटुंबातील तीन-तीन दलित किंवा तीन-तीन अन्य मागासवर्गीयांचे खासदार एकाच वेळी निवडून आले आहेत काय ? मात्र, हे पक्ष चालविणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन तीन व्यक्ती एकाच वेळी खासदार झालेल्या दिसतात. ही त्यांची मागासवर्गिय आणि दलितांसंबंधीची आस्था आहे. आम्ही आमचा पक्ष असा एका कुटुंबाकडे गहाण टाकलेला नाही, अशा अर्थाचा टोला त्यांनी लगावला.
85 पैसे कोठे जात होते…
दिल्लीतून 1 रुपया निघाला की त्यातले पेवळ 15 पैसे गरीबांपर्यंत पोहचतात, असे विधान देशाच्या एका माजी नेत्याने केले होते. मात्र, रुपयातील 85 पैसे कोणाच्या खिशात पडत होते, हे सर्वांना माहीत आहे. आम्ही 10 वर्षांच्या काळात तब्बल 40 लाख कोटी रुपयांचे लाभ थेट लोकांच्या खात्यांमध्ये जमा केलेले आहेत. एक रुपयापैकी पूर्ण रक्कम त्यांच्या नावावर जमा केली आहे. असा सुखद अनुभव जनतेला यापूर्वी कधीच आला नव्हता, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
युवकांना फसवी आश्वासने
विरोधी पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी युवकांवर आश्वासनांचा पाऊस पाडला. पण निवडून आल्यानंतर त्या आश्वासनांची पूर्तता कधीच केली नाही. असे पक्ष आज आम्हाला जाब विचारण्यात पुढे आहेत. आम्ही युवकांसाठी भरीव कार्य केले आहे. कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून त्यांच्या भविष्याची सोय केली आहे. त्यामुळेच त्यांचा आमच्यावर विश्वास आहे, अशी मांडणी त्यांनी केली.
भारताची विदेशात मानहानी
काही विरोधी पक्ष नेत्यांना परराष्ट्रांमध्ये देशाची मानहानी करण्याची हौस आहे. ते तेथे जाऊन अनेक आश्चर्यकारक विधाने करतात. काही नेत्यांना देशाच्या विदेश नीतीविषयी ज्ञान पाजळल्याशिवाय करमत नाही. आपल्या विधानांमुळे आपल्याच देशाची कोंडी आपण करत आहोत, याचे भान त्यांना नाही. त्यांनी स्वत:ला सावरणे आवश्यक आहे, अशा अर्थाची टिप्पणी त्यांनी केली.
मुस्लीम महिलांना दिली सुरक्षा
घटनेच्या नावाने टाहो फोडणाऱ्या आणि आपल्या खिशात घटनेच्या प्रतीला स्थान देणाऱ्यांनी कधीच देशातील मुस्लीम महिलांना सुरक्षा देण्यासाठी पावले उचलली नाहीत. आम्ही मात्र तत्काळ तोंडी तीन तलाकच्या जाळ्यातून त्यांची सुटका केली आहे. घटनेचे क्रियान्वयन कसे करायचे असते, याचा वस्तूपाठच आम्ही समोर ठेवला आहे. काश्मीरमध्ये अलगाववाद पोसणारा घटनेचा 370 वा अनुच्छेद आम्ही एकात्मतेच्या भावनेची आणि घटनेशी प्रामाणिक राहून निष्प्रभ केला आहे. याचा सुपरिणाम आज काश्मीरमध्ये दिसत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास
आमच्या सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासावर कधी नव्हता इतका भर दिला आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला आघाडी मिळावी, यासाठी ‘टिंगरिंग लॅब्ज’ची स्थापना मोठ्या प्रमाणात केली आहे. अशा 10 हजार लॅब्ज आज कार्यरत आहेत. अर्थसंकल्पात अशा 50 हजार लॅब्ज निर्माण करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे तंत्रज्ञान विकासाचे धडे आम्हाला विरोधी पक्षांनी देऊ नयेत, अशी टिप्पणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
गरीबीची उपहास
मागच्या काही दशकांपूर्वी देशात गरीबी हटाओ ही घोषणा देण्यात आली होती. पण ती नुसती घोषणाच राहिली. गेल्या 10 वर्षांच्या आमच्या कार्यकाळात या संबंधात खरे कार्य झाले. या कालावधीत 25 कोटी लोकांना गरीबीच्या जंजाळातून बाहेर काढण्यात आले. आम्ही केवळ घोषणा देऊन थांबत नाही, तिचे कार्यान्वयन करण्याचा प्रयत्न करतो, असा टोमणाही त्यांनी काँग्रेसला उद्देशून मारला. काही राज्यांनी केंद्र सरकारची आयुषमान योजना आपल्या राज्यातील लोकांपर्यंत पोहचविलीच नाही. अशा प्रकारे प्रत्येकवेळी राजकारण पाहण्याची त्यांची वृत्ती जनतेच्या मुळावर उठत आहे, अशीही टीका त्यांनी केली.
सरकारची प्रशंसा, विरोधकांवर घाव
ड दहा वर्षांमधील केंद्र सरकारच्या कामगिरीमुळे विरोधकांना नैराश्य
ड विरोधकांची वृत्ती नकारात्मक, त्यांचा तुष्टीकरणावर मोठा विश्वास
ड गेल्या दहा वर्षांमध्ये गरीबी हटविण्याच्या दिशेने देशाची मोठी झेप
ड जनतेचा पैसा जनतेच्या हाती, या धोरणासह केंद्र सरकार अग्रेसर