इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा थरार सगळ्यांनाच ठाऊक असेल. अनेकांच्या वाचनातही आलं असेल. मात्र, याच प्रसंगावरून मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेच्या थराराबाबत वक्तव्य केलंय. याच विधानावरून राजकीय वातावरणही तापलंय. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर टीकास्त्र डागलंय. राहुल सोलापूरकर कॉपी करून पास झालेला माणूस असल्याची टीका त्यांनी केलीय.
'राहुल सोलापूरकर, शरद पोंक्षे आणि चितळे हे लोक सांस्कृतिक कार्यक्रम करून मनोरंजन करतात, असं लोकांना वाटतं. परंतु तसं काहीच नाही. ते राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतात. भूमिका वठवणाऱ्यांनी पात्रांच्या विचारांचं अनुकरण केलं पाहिजे. पण इतरांच्या भूमिका विकृत करू नये', असं म्हणाल्या.
'राहुल सोलापूरकरांचं वक्तव्य हे ठरवून केलेलं आहे. सगळ्या महापुरुषांचे आदर्श मोडीत काढून हेडगेवार, गोळवलकर, श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदर्श ठरवण्यासाठी धडपड केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून राहुल सोलापूरकरांचं हे वक्तव्य असल्याचा आरोप अंधारे यांनी केलाय.
'राहुल सोलापूरकर कॉपी करून पास झालेला माणूस आहे. त्यांनी काही वाचन केलं असेल असं मला वाटत नाही. संघाने पुरवलेल्या पुरवणाऱ्यांवर जगणारी ही बांडगुळं आहेत. मत मागण्यासाठी तुम्ही शिवरायांचं नाव घेता आणि अशा लोकांना आता पाठीशी घालता. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपला जर सन्मान असेल तर, राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी', अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.
राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले?
एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. आग्य्राहून सुटकेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणत्याही पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर त्यांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असं वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. त्यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापलंय. अनेक नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून टीका केली. जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांनीही ट्वीट करत सोलापूरकरांवर टीकेचे बाण सोडले.