अल्पवयीन मुलीचे आत्महत्या प्रकरण, शिंदेंच्या शिवसेना उपजिल्हाप्रमुखाला 10 वर्षांची शिक्षा
Marathi February 05, 2025 04:24 AM

लातूर : अल्पवयीन मुलीच्या आत्महत्याप्रकरणी लातूर शिवसेना उपजिल्हाप्रमुख विकास जाधव याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उदगीर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल हा निकाल दिला. 2020 साली हे प्रकरण घडलं होतं. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलं.

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी असलेला विकास जाधव (Latur Shiv Sena Vikas Jadhav) याने 2020 मध्ये एका अल्पवयीन असलेल्या मुलीशी संबंध ठेवले होते. वेळोवेळी घरच्यांनी समजून सांगितल्यानंतरही त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना तो धमकावत होता. आपल्या राजकीय पदाचा आणि गुंडगिरीचा वापर करून त्याने पीडित अल्पवयीन मुलगी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दहशतीत ठेवलं होतं.

जाचाला कंटाळून मुलीची आत्महत्या

विकास जाधवने तब्बल एक वर्ष पीडित मुलीशी संबंध ठेवल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. ग्रामीण भागामध्ये बदानामी आणि बेइज्जत होऊ नये, संबंधित मुलीचे लग्न होणार नाही या भीतीने कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार केली नाही. मात्र त्याचा फायदा घेऊन तो जोरजबरदस्तीचा प्रयत्न करत होता.

आरोपीवर गुन्हा नोंद

विकास जाधवच्या जाचाला कंटाळून अखेर संबंधित मुलीने स्वतःची जीवन यात्रा संपवली. तिने आत्महत्या केल्यानंतर वाढवणा पोलीस ठाण्यामध्ये 3 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय दंड संहिता कलम 376, 506 आणि 366 या अंतर्गत पोस्कोचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

गु्न्हा नोंदवल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक सुद्धा केली होती. मात्र काही दिवसांत विकास जाधव जामिनावर सुटून बाहेर आला. मयत मुलीच्या वडिलांनी प्रकरण कोर्टात नेलं आणि त्याचा पाठपुरावा केला. 21 ऑक्टोबर 2020 रोजी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. त्यानंतर 2022 साली आरोप निश्चित करून सुनावणीला सुरुवात झाली. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी, पोलीस, तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, पंच अशा एकूण 13 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.

सोमवारी उदगीर येथील विशेष अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला. त्यानुसार पीडित मुलीच्या मृत्यू प्रकरणी विकास जाधव याला दोषी ठरवण्यात आले. त्यासाठी दहा वर्षे शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा दंड न भरल्यास आणखी सहा महिने कारावास भोगण्याचे निकाल पत्रकात उल्लेख आहे. त्याचबरोबर धमकी प्रकरणातही आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.