आप द्वारे दबाव युक्तीचा प्रयत्न!
Marathi February 05, 2025 10:24 AM

केजरीवाल यांच्या आरोपांना आयोगाचे प्रत्युत्तर, दिल्लीत सर्व 70 मतदारसंघांमध्ये आज मतदान

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षपात केला जात आहे, हा आम आदमी पक्षाचा आरोप हे निवडणूक आयोगाच्या विरोधातील एक दबावतंत्र आहे, असा घणाघात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केला आहे. आम आदमी पक्षाकडून सातत्याने निवडणूक आयोगावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न चाललेला असून आम्ही त्याला संयम आणि धीरोदात्तपणे उत्तर दिले आहे, अशीही स्पष्टोक्ती राजीव कुमार यांनी केली आहे.

आम आदमी पक्षाकडून निवडणूक आयोगाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे. हे या पक्षाचे राजकीय धोरण असू शकते. दिल्लीच्या मुख्यमंत्री अतीशी आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नेहमी निवडणूक आयोगाच्या नि:पक्षपाती भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. तथापि, असल्या तंत्रामुळे निवडणूक आयागोचे लक्ष विचलित होणार नाही. आम्ही नियमांच्या अनुसार आमचे काम करतच राहणार आहोत, असेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

आतीशी यांचे आरोप

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून उघडपणे आदर्श आचारसंहितेचा भंग होत आहे. तथापि, निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आम आदमी पक्षावर मात्र आयोगाची वक्रदृष्टी आहे. भारतीय जनता पक्षाकडून मतदारांना पैसे आणि वस्तू वाटल्या जातात. आमिषे दाखविली जातात. यासंदर्भात आम्ही पोलीस आणि निवडणूक आयोग यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. तथापि, त्यांची दखल घेतली जात नाही, असे आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री आतीशी यांनी केले आहेत.

आयोगाचा भाजपला पाठिंबा

आता निवडणूक आयोग आणि दिल्लीचे पोलीस या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अधिकृतरित्या पाठिंबा देत आहते, असे चित्र दिसत आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या गुंडगिरीला निवडणूक आयोगाचे सहकार्य आहे, असेही वक्तव्य त्यांनी केले होते. मंगळवारी, मतदानाच्या आदल्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे सर्व आरोप खोडून काढले असून प्रत्युत्तर दिले आहे.

आज दिल्लीत मतदान

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान होत आहे. या राज्यात विधानसभेच्या 70 जागा आहेत. या सर्व 70 जागांवर एकाच दिवशी मतदान होत आहे. भारतीय जनता पक्ष, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये या निवडणुकीत चुरस आहे. या पक्षांनी सर्व जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 अशी असून संध्याकाळी 6 वाजता जे मतदार रांगेत उभे असतील, त्यांनाही मतदानाची संधी देण्यात येणार आहे. बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्यापूर्वी कोणत्याही वृत्तवाहिनीने किंवा संस्थेने त्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध करु नयेत, असा आदेश काढला आहे. संध्याकाळी साडेसहा नंतरच एक्झिट पोल किंवा मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्ष प्रसिद्ध केले जातील. या निष्कर्षांमध्ये साधारणत: कल कोणाकडे आहे, याचे अनुमान काढता येऊ शकते. तथापि, अनेकदा असे निष्कर्ष चुकीचेही ठरु शकतात. त्यामुळे 8 फेब्रुवारीला होणाऱ्या मतगणनेनंतर जो परिणाम समोर येईल, तोच खरा असेल. म्हणून 8 फेब्रुवारीच्या दुपारनंतर या निवडणुकीच्या परिणामांचे चित्र स्पष्ट होणार आहे. भारतीय जनता पक्ष, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही प्रतिस्पर्धी पक्षांनी त्यांच्या त्यांच्या विजयाचे भाकित केले आहे.

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

दिल्लीच्या सर्व 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासनाने पूर्ण सज्जता केली आहे. मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर आयोगाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. मतदारांना कोणतीही असुविधा अनुभवावी लागू नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली. सर्व मतदान अधिकारी त्यांच्या केंद्रांवर पोहचले असून बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून मतदानाच्या सज्जतेला प्रारंभ केला जात आहे.

दिल्लीत मतदानासाठी सज्जता

ड सर्व 70 मतदारसंघांमध्ये आज बुधवारी मतदान, सर्व व्यवस्था पूर्ण

ड तिन्ही मुख्य पक्षांनी केले विजयाचे भाकित, 8 फेब्रुवारीला मतगणना

ड मतदानाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची सज्जता

ड आम आदमी पक्षाचे सर्व आरोप निराधान : मुख्य निवडणूक आयुक्त

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.