भेटलेला 'देव'माणूस
esakal February 06, 2025 09:45 AM

फिल्म इंडस्ट्री म्हटली, की रात्री उशिरा पॅकअप, लवकर कॅालटाइम, १४-१५ तास शूट, हे सगळं अगदी रोजचंच. मग कधीतरी गाडी चालवायचा कंटाळा येतो आणि मी रिक्षानं प्रवास करते किंवा मुंबईच्या ट्रॅफिकमधून पटकन निघण्यासाठी चक्क माझ्या हेअरड्रेसरबरोबर तिच्या स्कूटीनं येते-जाते!

त्या दिवशी दिवसभर वेगवेगळ्या मालिकांमधल्या कलाकारांबरोबर शूट होतं.. त्यात एका सीनमध्ये मी ‘‘विठुरायाचा आशीर्वाद वाया जाणार नाही’, हे वाक्य घेतलं होतं! आणि का कोण जाणे घरी जाताना त्या ट्रॅफिकच्या कर्कश्श आवाजातही ते वाक्य सतत माझ्या कानात घुमत होतं..

माझी हेअरड्रेसर मला नेहमी जिथं सोडते तिथं मी उतरले. वेळ रात्री पावणेबाराची. भांडुप पंपिंग बस स्टॅाप. एरवी खूप रहदारीनं गजबजलेला हा बसस्टॅाप रात्री मात्र एकदम भयाण वाटत होता. सिग्नल सुटल्यावर फक्त मोठ्या ट्रेलर्सचा तो आदळणारा आवाज भीतिदायक होता. एकही रिक्षा येत नव्हती, ना बस येत होती. मी १५-२० मिनिटं वाट बघत होते.

मनात सतत ते वाक्य सुरू होतंच. तेवढ्यात एक शिवनेरी त्या बसस्टॅापला येऊन थांबली. मी हात दाखवला... त्या स्टॅापला उतरणारे प्रवासी उतरले आणि मी ड्रायव्हरदादांना मला कुठं उतरायचंय ते सांगितलं. पैसे काढायला पर्स उघडली. त्यावर आवाज आला, ‘अगं, ताई पैसे नकोत. एवढ्या उशिरा बसस्टॅापला एकटी उभी होतीस म्हणून गाडी थांबवली. बस बस!’ आणि माझा जीव भांड्यात पडला. माझा प्रवास तसा अगदी चार-पाच किलोमीटरचा असणार होता! पण मला अनुभव आयुष्यभराचा मिळाला!

मी बसून सेटल होतच होते, तेवढ्यात मला हाक आली, ‘बबड्या, एवढ्या उशिरापर्यंत का बाहेर थांबतेस? लवकर जायचं ना घरी!’ मी क्षणभर त्या बसच्या काळोखात हे कोण बोलतंय ते शोधत होते आणि कळलं, की ते बस ड्रायव्हर काका मला विचारत होते. त्यांच्या या प्रश्नाचं मला कैातुक वाटलं आणि गंमतही. किती साधासरळ प्रश्न; पण त्या क्षणाला खूप आपुलकी वाटली. आधार वाटला. पुढचा स्टॅाप आला आणि काकांनी तिथं उतरणाऱ्या प्रवाशांना अगदी मनापासून बाय केलं. ‘गुडनाईट’ही म्हणाले. मला खूपच गंमत वाटत होती. एवढ्या उशिरा पुण्याहून बस घेऊन यायचं आणि हा उत्साह! कमाल!! त्यात त्यांचं वयही काही कमी नव्हतं.

पुढे टोलनाक्याला थोडं ट्रॅफिक लागलं.. तेव्हा बाजूच्या कारमधल्या छोट्या बाळाकडे बघून त्यांच्या छान गप्पा झाल्या. त्या बाळाला बाय करून काकांनी गाडी पुढे काढली. मला परत आपुलकीनं विचारलं, ‘ताई, तू जिथं उतरणार तिथं कोणी न्यायला येणारेय का?’ आणि त्यावर मला वाटलं ही तर माझी रोजचीच येण्याची वेळ. त्या दिवशी गाडी नाही नेली म्हणून अडकले. आता बसमधले सगळे प्रवासी उतरून गेले होते.

बस डेपोकडे चालली होती. मग मी काकांची मुलाखतच घेतली. त्यांचं नाव सुनील खराळे. राजगुरूनगर, मंचरचे ते! शेवटची बस घेऊन आले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळची पहिली बस घेऊन जाणार होते ते. मी त्यांना खूप कुतूहलानं विचारलं, ‘रात्री झोपणार कुठे?’ त्यावर त्यांनी त्यांच्या सीटमागे वायरनं बांधलेला पुठ्ठ्यांचा गठ्ठा दाखवला आणि म्हणाले, ‘हा माझा बेड!’ अजून एक गंमतशीर गोष्ट अशी, की काकांनी युनिफॅार्मवर वारकरी घालतात तसं उपरणं घेतलं होतं.

आता बस डेपोमध्ये पोहोचली होती. सगळे लाइट्स ॲान झाले आणि मी काकांना बघितलं. त्यांनी मला परत सांगितलं, ‘एवढ्या उशिरा तिथं उभी नको राहू बाई, वेळेत घरी जा!’ त्यावर मी त्यांना म्हटलं, ‘काय करू काका? मी जिथं काम करते, तिथून घरी यायला हीच वेळ होते.’ त्यावर काकांनी विचारलं, ‘कशात कामाला हायेस?’ आणि मी त्यांना विचारलं, ‘तुम्ही ‘ठरलं तर मग’ मालिका बघता का?’ त्यावर ते पटकन म्हणाले, ‘हो, घरी सुरू असते. मी घरी असलो, की बघतो.’ त्यावर मी म्हणाले, ‘मी त्यातली सायली!’... आणि माझ्या तोंडाला बांधलेली ओढणी सोडली!

...पुढची पाच मिनिटं माझ्यासमोर फक्त एक उत्साही काका होते- जे निःशब्द होते! त्यांना काय करू, काय नको काही सुचत नव्हतं. त्यांनी पटकन वरच्या रॅकमधून एक पिशवी काढली आणि त्यातून मला वारकऱ्यांची कोरी पांढरी टोपी काढून दिली. स्वतःही घतली आणि उत्साहानं माझ्याबरोबर फोटो काढले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही खूप छान वाटलं. दिवसभराचा थकवा निघून गेला. मी त्याच आनंदात रिक्षेत बसले आणि डोक्यावरची टोपी काढताना काहीतरी जाणवलं आणि अंगावर शहारा आला...

...पुन्हा ते वाक्य आठवलं...‘विठुरायाचा आशीर्वाद वाया नाही जाणार!’...

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.