सर्कल संस्था/हैदराबाद
तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) बिगर हिंदू कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. मंदिरात काम करताना इतर धर्मांच्या परंपरा पाळत असल्याने 18 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचे समजते. टीटीडीचे अध्यक्ष बी. आर. नायडू यांच्या निर्देशानुसार आणि भगवान वेंकटेश्वराचे पावित्र्य लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. यासंबंधी ‘टीटीडी’ने एक निवेदन जारी केले असून गैर-हिंदू धार्मिक परंपरांचे पालन करणाऱ्या 18 कर्मचाऱ्यांना संस्थेतून हटवल्याचे स्पष्ट केले आहे.
या कर्मचाऱ्यांनी नियुक्तीवेळी हिंदू भाविकांचा आदर करण्यासाठी आणि मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी ते वचनबद्ध राहतील अशी शपथ घेतली होती. परंतु त्यांची सध्याची कृती अयोग्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. टीटीडी उत्सव आणि विधींमध्ये सहभागी होण्यासोबतच हे कर्मचारी इतर धर्मांच्या धार्मिक परंपरांचे पालन करत होते. भगवान वेंकटेश्वर मंदिराच्या पावित्र्याला प्राधान्य देत व्यवस्थापनाने संबंधित कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.