- सायली शिंदे, योगतज्ज्ञ
‘टीचर, आम्ही ऑफिसमध्ये बसून बसून कंटाळतो, पाठदुखी सुरू झालीये आणि हल्ली वजनही वाढतंय...’ माझ्या एका विद्यार्थिनीनं ऑनलाइन क्लासमध्ये सांगितलं. तिच्या म्हणण्यानुसार, दिवसभर संगणकासमोर बसून काम केल्यामुळे पाठदुखी, मानदुखी, डोळ्यांचा थकवा आणि सततचा तणाव वाढला आहे.
हे ऐकून मला जाणवलं, की माझ्या अनेक विद्यार्थिनी अशाच समस्यांचा सामना करत असतील. म्हणूनच, डेस्क जॉब करणाऱ्या महिलांसाठी काही सोपी; पण प्रभावी योगासनं आणि आरोग्यदायी टिप्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे.
डेस्क जॉबचे दुष्परिणाम
पोस्चर बिघडणे : सतत खुर्चीत बसल्याने पाठीवर अनावश्यक दडपण येते.
पाठदुखी व मानदुखी : मणक्यांवर ताण येऊन दीर्घकाळ त्रास होऊ शकतो.
हालचाल कमी झाल्याने वजन वाढते आणि चयापचय मंदावतो.
कामाचा ताण आणि स्क्रीन टाइममुळे डोळ्यांचा थकवा व डोकेदुखी वाढते.
शरीरातील ऊर्जा कमी होणे : सतत एका जागी बसल्याने शरीर जड वाटू लागते.
सोपी योगासने
ताडासन (Mountain Pose)
फायदे : पाठीचा कणा ताठ राहतो, शरीर संतुलित होते, स्नायू सक्रिय होतात.
कसे करावे?: उभे राहून दोन्ही हात वर उंच करा, संपूर्ण शरीर ताणून धरा, ५-१० श्वास घ्या.
वज्रासन
फायदे : पचनक्रिया सुधारते, गुडघे,पाठीच्या समस्या कमी होतात.
कसे करावे? : गुडघे टेकून बसा, दोन्ही हात मांडीवर ठेवा, पाठ ताठ ठेवा.
बद्धकोनासन
फायदे : कंबर, मांड्या आणि गुडघे लवचिक होतात, रक्ताभिसरण सुधारते.
कसे करावे?: दोन्ही पाय एकत्र आणून फुलपाखरासारखी हालचाल करा.
मार्जारासन
फायदे : पाठीच्या कण्याला लवचिकता येते, पाठदुखी कमी होते.
कसे करावे?: चौपायी स्थितीत राहून श्वास घेताना पाठ वाकवा (Cat), श्वास सोडताना पाठ खाली झुकवा (Cow).
अर्धमत्स्येंद्रासन
फायदे : पोटातील चरबी कमी होते, कंबर लवचिक होते.
कसे करावे?: खुर्चीवर बसून कमरेला उजवीकडे आणि डावीकडे वळवा.
महत्त्वाच्या टिप्स
दर ३०-४५ मिनिटांनी खुर्चीतून उठून दोन-तीन मिनिटे चालायला जा.
पाठ ताठ ठेवा, खुर्चीत सावरून बसा.
२०-२०-२० नियम : दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी २० फूट लांब बघा.
पुरेसं पाणी प्या आणि हलका आहार घ्या.
ऑफिसमध्ये छोट्या ब्रेकमध्ये काही स्ट्रेचिंग किंवा योगासने करा.
रोजच्या दिनचर्येत किमान १५-३० मिनिटे योगासने आणि प्राणायाम करा.
डेस्क जॉब करणाऱ्या महिलांनी शरीराच्या तंदुरुस्तीसाठी लहान लहान सवयी लावून घेतल्या तर दीर्घकालीन आरोग्यविषयक त्रास टाळता येईल. आजच ही योगासनं आपल्या दिनचर्येचा भाग बनवा आणि निरोगी जीवनशैली अंगीकारा!