11 एक्झिट पोल्सपैकी 9 मध्ये भाजपला बहुमताचा अंदाज व्यक्त : केजरीवालांना धक्का बसण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीमध्ये बुधवारी मतदान पार पडताच विविध सर्वेक्षण संस्थांनी एक्झिट पोलचे निष्कर्ष जारी केले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीकरता अनेक पोलिंग एजन्सींनी जारी केलेल्या बहुतांश एक्झिट पोलनी भाजपच्या बाजूने कल व्यक्त केला आहे. 11 पैकी 9 एक्झिट पोल्समध्ये भाजपला दिल्लीत स्वबळावर बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे तब्बल 27 वर्षांनी दिल्लीत भाजप सत्तेवर येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला स्वत:च्या बालेकिल्ल्यात पराभवाला सामोरे जावे लागू शकते. निवडणुकीचा निकाल येत्या शनिवारी म्हणजे 8 फेब्रुवारीला लागणार आहे.
दिल्लीत एकूण 70 मतदारासंघ असून बहुमतासाठी 36 इतकी ‘मॅजिक फिगर’ गाठावी लागणार आहे. येथे भाजप आणि आप यांच्यात मुख्यत्वे लढत झाली होती. तर काँग्रेसचा या निवडणुकीत फारसा प्रभाव दिसून आला नसल्याचे चित्र आहे. मॅट्रिजच्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला 32-37 जागा मिळू शकतात. तर भाजपला 35-40 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला केवळ 0-1 जागेवर समाधान मानावे लागू शकते. जेवीसीच्या एक्झिट पोलनुसार ‘आप’ला 22-31 जागा मिळू शकतात. तर भाजपला 39-45 जागा आणि काँग्रेसला 0-2 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजप स्वबळावर बहुमत प्राप्त करण्याची शक्यता आहे.
‘चाणक्य’चीही भाजपला पसंती
चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजप 39-44 जागा जिंकू शकतो. तर ‘आप’ला 25-28 जागांवर समाधान मानावे लागू शकते. चाणक्यनुसार काँग्रेसला 2-3 जागा मिळण्याची शक्यता आहे. पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला केवळ 10-19 जागा मिळू शकतात. तर भाजप 51-60 जागांवर विजयी होऊ शकतो. या सर्वेक्षणानुसार काँग्रेसचे दिल्लीत खातेही उघडणार नाही.
पीपल्स इनसाइटनुसार भाजपला 40-44 जागांवर यश मिळू शकते. ‘आप’ला 25-29 जागांवर विजय मिळू शकतो. काँग्रेसला 0-1 जागा मिळण्याची शक्यता आहे. पोल डायरीनुसार भाजपला 42-50 जागांसह पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तर ‘आप’ला केवळ 18-25 जागांवर समाधान मानावे लागू शकते. काँग्रेसला या सर्वेक्षणानुसार 0-2 जागा मिळण्याची शक्यता आहे.
पी-मार्क पोलिंग एजन्सीच्या अनुमानानुसार भाजप सहजपणे बहुमताचा आकडा पार करू शकतो. भाजपला 39-49 जागा मिळण्याचा अनुमान आहे. दुसरीकडे ‘आप’ला 21-31 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला या सर्वेक्षणातही केवळ 0-1 जागा मिळणार असल्याचे निष्कर्ष काढण्यात आला आहे. डीवी रिसर्चने भाजप 36-44 जागा जिंकून सरकार स्थापन करणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. या एक्झिट पोलमध्ये ‘आप’ला 26-34 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
काही सर्वेक्षणात ‘आप’च्या बाजूने कल
वी-प्रीसाइड पहिले एक्झिट पोल आहे, ज्यात आम आदमी पक्ष सत्ता राखणार असल्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे. वी-प्रीसाइडने ‘आप’ 46-52 जागांवर विजयी होऊ शकतो असा निष्कर्ष काढला आहे. तर भाजपला 18-23 जागांवर यश मिळणार असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर माइंड ब्रिकने ‘आप’ला 44-49 जागा मिळण्याचा अनुमान व्यक्त केला आहे. तर भाजपला 21-25 जागा आणि काँग्रेसला 0-1 जागा मिळण्याचा अनुमान व्यक्त केला आहे.
राज्य समीकरण
दिल्लीत विधानसभेच्या 70 जागा असून याकरता 699 उमेदवार उभे राहिले होते. माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपचे प्रवेश वर्मा यांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. दुसरीकडे विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना कालकाजी मतदारसंघातून निवडणूक लढवत असून भाजपचे रमेश बिधूडी यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
एक्झिट पोल अंदाज…
संस्था/एजन्सी भाजप + आप काँग्रेस
मॅट्रिज 35-40 32-37 0-1
जेव्हीसी 39-45 22-31 0-2
चाणक्य स्टॅटेजीज 39-44 25-28 2-3
लोकांची नाडी 51-60 10-19 0
पोलस अंतर्दृष्टी 40-44 25-29 0-1
पोल डायरी 42-50 18-25 0-2
पी-मार्क 39-49 21-31 0-1
व्ही-प्रीस्टाइड 18-23 46-52 0-1
माइंड ब्रिंक 21-25 44-49 0-1
डीव्ही-रेस्ट 36-44 26-34 0
एसएएस 38-41 27-30 1-3