Deportation Story: अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना घेऊन अमेरिकन लष्कराचं सी१७ विमान पंजाबच्या अमृतसरमध्ये बुधवारी दाखल झालं. या विमानातून अमेरिकेनं १०४ जणांना भारतात परत पाठवलं. यात सर्वाधिक पंजाब, हरियाणा आणि गुजरातचे आहेत. याशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि चंडिगढच्या काही जणांचा समावेश आहे. ही भारतात परत पाठवलेली पहिली तुकडी असून अजून काही जणांना परत पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, मायदेशी पाठवण्यात आलेल्यांनी धक्कादायक असे खुलासे केले आहेत.
गुरुदासपूरच्या हरदोवाला गावचा जसपाल हा अमेरिकेला जाण्यासाठी जुलै २०२४ मध्ये निघाला होता. अमेरिका ते दिल्ली हे विमानाने २५-३० तासांचं अंतर जाण्यासाठी जसपालला ६ महिने लागले. तर अमेरिकेच्या लष्करी विमानाने जसपालला पुन्हा भारतात पाठवलं. ६ महिन्यांनी पुन्हा भारतात परतलेल्या जसपालने सांगितलं की, हातात बेड्या होत्या. पायात साखळ्या बांधल्या होत्या. विमानात बसवलं तेव्हा कुठे नेलं जातंय हेसुद्धा सांगितलं नाही.
जसपाल म्हणाला की एका पोलीस अधिकाऱ्याने अचानक सांगितलं तुम्हाला भारतात परत पाठवलं जात आहे. आमच्या बेड्या अमृतसर विमानतळावर काढण्यात आल्या. जसपालने त्याच्यासोबत घडलेल्या घटनेला ट्रॅव्हल एजंट दोषी असल्याचं सांगितलं. मी एजंटला वैध व्हिसा हवाय सांगितलेलं. पण त्याने मला फसवलं. ३० लाखांचा व्यवहार ठरला होता असंही जसपाल म्हणाला.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात जसपाल विमानाने ब्राझीलला गेला होता. तिथून पुढचा प्रवासही विमानाने असेल असं एजंटने सांगितलं पण फसवणूक झाली. एटंजनं बैकायदेशीरपणे सीमा ओलांडण्यास भाग पाडलं. अमेरिकेत घुसखोरी करायला लावली.
ब्राझीलमध्ये जसपाल ६ महिने बेकायदेशीर राहिला. त्याच्याकडे वैध कागदपत्रं नव्हती, कोणाकडे कसलीच तक्रार करू शकत नव्हता. कारण त्याची पोलखोल झाली असती. जसपाल म्हणाला की, ब्राझीलमधून बॉर्डर क्रॉस करून अमेरिकेत घुसलो. २४ जानेवारीला अमेरिका बॉर्डर पेट्रोलने अटक केली. ११ दिवस कस्टडीत ठेवलं आणि पुन्हा विमानात बसवलं. अमेरिकेला जाण्यासाठी खूप पैसे खर्च केले होते, आता सगळं संपलंय असं जसपाल म्हणाला. जसपालच्या आईने मात्र वेगळीच कहाणी सांगितलीय. दोन वर्षे इंग्लंडमध्ये काम केल्यानंतर जसपाल सिंह १२ दिवसांपूर्वी अमेरिकेला गेला होता असं आईने म्हटलंय.
अमेरिकन लष्कराच्या विमानातून बुधवारी १०४ बेकायदा वास्तव्य करणारे भारतीय अमृतसर विमानतळावर उतरले. १०४ जणांमध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीनांचा समावेश आहे. आणखी काही बेकायदा वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना अमेरिका मायदेशी पाठवणार आहे. मात्र अद्याप अधिकृत आकडा समोर आलेला नाही.