अमेरिकेनं बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १०४ भारतीयांना मायदेशी पाठवलं. अमेरिकेतून भारतात पाठवलेल्या या भारतीयांना मेक्सिको अमेरिका सेमीवरून ताब्यात घेण्यात आलं होतं. भारतातून अमेरिकेत जाण्यासाठी हे सर्वजण डंकी रुटचा वापर करत असल्याचं आढळून आलं होतं. दरम्यान, या सर्वांची वेगळी अशी कहानी आहे.
अमेरिकन लष्कराच्या विमानातून १०४ जणांना भारतात पाठवण्यात आलं. यासोबत त्यांच्या अमेरिकेतील स्वप्नांचा चुराडा झाला. अनेकांनी आपले अनुभव शेअर केले आहेत. काहींनी अमेरिकेत जाताना एजंटने फसवणूक केल्याचंही म्हटलंय. तर काहींनी इथली जमीन विकून अमेरिकेत गेलो होतो असं सांगितलंय.
कर्नालच्या घरौडा इथल्या कालरों गावातला २० वर्षांचा आकाश घरची अडीच एकर जमीन विकून गेला होता. त्याला अमेरिकेला पाठवण्यासाठी एजंटने ६५ लाख रुपये मागितले होते. तर ६ ते ७ लाख रुपये वेगळा खर्च झाला. जवळपास १० महिन्यांपूर्वी तो भारतातून गेला. तर २६ जानेवारीला मेक्सिकोतून युएसएमध्ये पोहोचला. पण तिथंच त्याला पकडण्यात आलं.
डंकी रूटचे दोन मार्ग आहेत एक थेट मेक्सिकोत जायचं आणि तिथून भिंत ओलांडून अमेरिकेत. तर दुसरा मार्ग अनेक देशांमधून विमान, टॅक्सी, बसने प्रवास करत जंगल, समुद्र मार्गे अमेरिकेत जायचं. एजंटने आकाशला त्याला थेट मेक्सिकोमार्गे पोहोचवू सांगत पैसे घेतले. पण दुसऱ्याच मार्गाने पोहोचवलं. आकाशच्या भावाने काही व्हिडीओ दाखवले जे जंगल मार्गे जातात.
आकाशचं त्याच्या कुटुंबियांशी शेवटचं बोलणं २६ जानेवारीला झालं होतं. तो मेक्सिकोतील भिंतीवरून उडी मारून अमेरिकेत दाखल झाला होता. त्याला तिथं चौकीत पकडण्यात आलं होतं. त्यानंतर काही काळ रिमांडमध्ये घाबरवून डिपोर्टिंगच्या कागदपत्रावर सह्या घेतल्या. आकाशच्या भावाला बुधवारी दुपारी तो भारतात येत असल्याचं समजलं.
अमेरिकेला जाण्यासाठी आकाशचा ७२ लाख रुपये खर्च झाला. डिपोर्ट झाल्यानंतर आकाश सकाळी घरी पोहोचला आणि तिथून मामाच्या घरी गेला. कुटुंबियांची स्थिती आता बिकट अशी झालीय. एजंटवर कारवाई करावी अशी मागणी होत असून डंकी रूटने अमेरिकेला जाऊ नका असंही कुटुंबियांनी सांगितलंय.