गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. एका सरकारी शाळेतील तीन शिक्षकांनी १३ वर्षांच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी तिन्ही आरोपींना बुधवारी पॉक्सो अंतर्गत अटक करण्यात आलीय. न्यायालयात हजर केल्यानंतर तिघांनाही १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ जानेवारीला घडली. शाळेच्या शौचालयातच तिन्ही शिक्षकांनी १३ वर्षांच्या विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केला. तामिळनाडुच्या कृष्णागिरी जिल्ह्यातील एका शाळेत घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कृष्णागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कृष्णागिरी जिल्ह्यातील एका सरकारी माध्यमिक शाळेत तीन शिक्षकांनी १३ वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केले. तिन्ही शिक्षकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. पॉक्सो कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना २ जानेवारी रोजी घडली तर महिन्याभराने उघडकीस आली. विद्यार्थीनीच्या आई-वडिलांनी मुख्याध्यापकांना याची माहिती दिल्यानंतर सगळा प्रकार समोर आला. माहिती मिळताच जिल्हा शिक्षण अधिकारी आणि चाइल्ड हेल्पलाइनने शिक्षकांवर कारवाई सुरू केली. पीडितेच्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे तिन्ही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केलीय. तिघांनाही अटक करण्यात आलीय.