गुरुवारी (६ फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड संघातील वनडे मालिकेला सुरूवात झाली असून पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट मैदानात खेळला जात आहे. या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहली खेळत नसल्याने भारताला मोठा धक्का बसला. पण असे असले तरी भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि हर्षित राणा यांचे वनडे पदार्पणही या सामन्यातून झाले.
सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी जैस्वालला कर्णधार रोहित शर्माकडून, तर हर्षित राणाला मोहम्मद शमीकडून पदार्पणाची कॅप देण्यात आली. नाणेफेकीवेळी रोहित शर्माने सांगितल की गुडघ्याची दुखापत झाल्याने तो या सामन्याला मुकला आहे.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडला सलामीवीर बेन डकेट आणि फिल सॉल्ट यांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी आक्रमक खेळताना ८ षटकांपर्यंत संघाला ७० धावांचा टप्पा पार करून दिला होता.
परंतु, फिल सॉल्ट दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात ९ व्या षटकात धावबाद झाला. श्रेयस अय्यरने क्षेत्ररक्षणात यावेळी चपळता दाखवली. सॉल्टने २६ चेंडूत ४३ धांवाची खेळी केली. त्यानंतर लगेचच १० व्या षटकात हर्षित राणाने इंग्लंडला दुहेरी धक्के दिले.
राणाने १० व्या षटकातील तिसऱ्या चेंडूला उसळी दिली, ज्यावर डकेटने मोठा फटका खेळला होता. पण त्यावेळी यशस्वी जैस्वाल मिड विकेटवरून मागे पळत आला आणि त्याने सूर मारत डकेटचा अफलातून झेल घेतला. त्याचा झेल पाहून अनेकांना २०२३ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ट्रॅव्हिस हेडने घेतलेल्या रोहित शर्माच्या झेलचीही आठवण करून दिली.
हेडनेही अशाच प्रकारे झेल घेतला होता. जैस्वालच्या या झेलामुळे डकेटला २९ चेंडूत ३२ धावांवर माघारी परतावे लागले. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हॅरी ब्रुकचा झेल यष्टीरक्षक केएल राहुलने घेतला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था बिकट झालेली. पण नंतर कर्णधार जॉस बटलर आणि जो रुट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु, खेळपट्टीवर स्थिरावलेल्या रुटला रवींद्र जडेजाने चूक करण्यास भाग पाडले. त्याने रुटला १९ धावांवर पायचीत पकडले. पण नंतर जेकॉब बेथेलने कर्णधाराची साथ देताना अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे ३० षटकांपर्यंत इंग्लंडने १६० धावांचा टप्पा पार केला होता.
परंतु, चांगल्या भागीदारीनंतर अखेर अक्षर पटेलने भारताला ब्रेकथ्रू मिळून दिला. त्याने बटलरला ५२ धावांवर बाद केले. त्याचा झेल हार्दिकने घेतला. त्यामुळे इंग्लंडचा अर्धा संघ १७० धावांवर माघारी परतला होता.