Ajit Pawar : "कोयता गँगचा बंदोबस्त करा, मकोका लावा.." भर कार्यक्रमात अजित पवारांनी पुणे पोलिसांना दिली तंबी
Saam TV February 07, 2025 12:45 AM

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Ajit Pawar : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय नवीन प्रशासकीय इमारत, पुणे पोलिस अधीक्षक कार्यालय भूमिपूजन तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण अशा विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन, उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले होते. दरम्यान या शासकीय कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी पुण्यातील कोयता गँगवर मकोका लावा असे विधान केले.

या कार्यक्रमात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 'पुण्यात गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांना आणि कोयता गँगला मकोका लावा. आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का? अजिबात नाही. कोयता गँग, गाड्या तोडफोड करणाऱ्यांचा बंदोबस्त करा. मकोका लावा काय करायचे ते करा. आम्ही काहीही कमी पडू देणार नाही तुम्हाला..' असे वक्तव्य केले.

'आरोपी पकडल्यानंतर त्याची अशी धिंड काढा. अख्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे', असे उपमुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला पुणे पोलीस आयुक्त गैरहजर होतो. तेव्हा त्यांना उद्देशून पवार यांनी 'आज या कार्यक्रमात आयुक्त हवे होते. त्यांना पण सुनावलं असतं' असे उद्गार काढले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवराचा सन्मान सुरु होता. तेथे उपस्थित काही तरुणांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली. यावर अजित पवार प्रचंड चिडले. त्यांनी माइक स्वत:कडे घेतला. ते म्हणाले, 'हा पोलिसांचा कार्यक्रम आहे. काय चाललंय, शिट्ट्या कशाला वाजवता, शिट्ट्या वाजवू नका, मुख्यमंत्री येथे आले आहेत. शिस्त आहे की नाही? शिट्ट्या वाजवल्या तर पोलिसांना उचलायला सांगेन.'

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.