सोलाापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई! जन्मठेपेच्या शिक्षेतील फरार आरोपी व मदत करणाऱ्या दोघांकडेही सापडल्या 3 पिस्टल; कळंबा जेलमध्ये ओळख झाल्यावर दोघेही पुन्हा जेलमध्ये गेलेच नाहीत
esakal February 07, 2025 06:45 AM

सोलापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या फाईक मुस्ताक कळंबेकर (वय ४६, रा. शिवाजी नगर, रत्नागिरी) हा तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला. चार महिन्यांपूर्वी त्याचा कालावधी संपूनही पुन्हा जेलमध्ये हजर झाला नव्हता. कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये ओळख झालेल्या निंगोडा बिराजदार याने फाईकची राहण्याची सोय मंगळवेढ्यातील शेतात केली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले असून त्याच्याकडे एक पिस्टल व पाच जिवंत काडतूस सापडले आहे.

खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप झालेला फाईक कळंबेकर याच्या ओळखीच्या निंगोडा हणुमंत बिराजदार याने फाईकला त्याच्या शेतात पत्राशेड करून राहण्याची सोय केली होती. त्याची खबर ग्रामीण पोलिसांना लागली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याला पकडण्यासाठी पहाटेच्या सुमारास सापळा लावला. तो सतत पिस्टल लोड करून वावरत असल्याने पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी कोणतीही घाई केली नाही. त्याला बेसावध असताना पकडले. त्यावेळी त्याच्याकडे पिस्टल व पाच जिवंत काडतूस सापडले. त्यासंदर्भात विचारणा केल्याने त्याने पिस्टल निंगोडा बिराजदार याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

पोलिसांनी निंगोडाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी भाऊ राजकुमार बिराजदार याच्या घरात तीन पिस्टल व १८ जिवंत काडतूस असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या कारवाईत एकूण चार पिस्टल व २१ जिवंत काडतूस सापडले. पिस्टल विक्रीसाठी त्यांनी आणले होते, अशीही माहिती समोर आली असून ते कोठून आणले याचा तपास सुरू आहे. न्यायालयाने तिघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

दोघेही जन्मठेपेच्या शिक्षेतील आरोपी

फाईक कळंबेकर (रा. रत्नागिरी) आणि त्याला मदत करणारा निंगोडा बिराजदार (रा. मंगळवेढा) हे दोघेही खुनाच्या गुन्ह्यात सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. दोघांचीही कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये ओळख झाली होती. दोघेही सध्या पॅरोलवर बाहेर होते आणि कालावधी पूर्ण होऊनही ते पुन्हा जेलमध्ये गेले नाहीत अशीही माहिती समोर आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.