छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे मुंबईत टर्मिनस आहे. तिथे शिवरायांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी शिवसेनेची जुनी मागणी आहे. परंतु अद्याप तिथे महाराजांचा पुतळा उभारलेला नाही, याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संताप व्यक्त केला. नतद्रष्ट भाजपला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ईव्हीएम मशीन वाटते, महाराष्ट्राचे आदर्श आणि दैवतांचा ते केवळ मतांसाठी वापर करत आहेत, असा जोरदार हल्ला चढवतानाच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लवकरात लवकर महाराजांचा पुतळा उभारला गेला नाही तर शिवसेना उभारेल, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला.
कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेतील मान्यताप्राप्त संघटनेच्या निवडणुकीत रेल कामगार सेनेने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर दादर येथे रेल कामगार सेनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच हा काwटुंबिक कार्यक्रम असल्याचे सांगून रेल कामगार सेनेच्या सैनिकांचे भरभरून काwतुक केले. सीआरएमएस आणि रेल कामगार सेना यांनी एकत्र येऊन चमत्कार करून दाखवला. या चमत्काराचे कौतुक करण्यासाठीच मी इथे आलोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आताचा जमाना असा आहे की, पक्षात येण्यापूर्वी आरक्षण पाहिजे. आरक्षण असेल तर लोक पक्षात येतात आणि जरा कुठे खुट्ट झालं तर आरक्षण दिलेलं असलं तरी लोकं डबे बदलतात, गाडय़ा बदलतात. पण रेल कामगार सेनेचे शिवसैनिक त्यातले नाहीत, रेल्वे कामगार म्हणजे एकच रूळ आहे आणि त्या रुळावरून तुमची योग्य वाटचाल सुरू आहे त्याचा मला अभिमान आहे, असे कौतुकोद्गार उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले. ज्यांना उद्दिष्टांचे रूळ नाहीत, हेतू नाहीत ते भरकटत आहेत. कधी या फलाटावर कधी त्या फलाटावर, त्यांना समाधान काहीच नाही. पण तुमच्यासारखे कट्टर आणि कडवट कार्यकर्ते कसलीही अपेक्षा न करता, केवळ आणि केवळ भगव्याचे पाईक आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नितीन गडकरी असे म्हणाले होते की, मुंबई-गोवा हायवे असा बनवू की त्यावर 200 वर्षे खड्डाच पडणार नाही. आता लोक म्हणतात की 200 वर्षे झाली तरी रस्ता होणार नाही. म्हणजे रस्ता व्हायला 200 वर्षे आणि त्यानंतर पुढची 200 वर्षे, बोलायला काय जातंय? मी तुम्हाला असं काहीतरू करून देईन की पुढची हजार वर्षे काही होणार नाही. अरे हजार वर्षे लेका तू तरी जगतोस का? अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली.
मुंबई महानगरपालिका, एसटी, बेस्ट अशा संस्था मारून टाकायचे काम सरकार करत आहे याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, एसटीची आज वाट लागलेली आहे. काल परवा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाला. जशी रेल्वे जीवनवाहिनी आहे तशी माझी एसटी गावागावात, खेड्यापाडय़ात जाते. तशी बेस्टची बस ही अनेक गल्लीबोळात जाते. पण आज एसटी तोटय़ात चालली आहे, बेस्टचा कोणी वाली राहिलेला नाही. रेल्वेचेही कधी खासगीकरण होईल हे सांगता येत नाही, अशा धोक्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मुंबई महापालिका कधीकाळी जगातील सर्वात श्रीमंत होती तीसुद्धा पूर्वीचे घटनाबाह्य मिंधे सरकार आणि आताच्या महायुतीने भिकेला लावली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तोफ डागली. आज सरकारने महापालिकेला अडीच लाख कोटींच्या खड्डय़ात घातले आहे. मुंबईकरांनी आणि शिवसेनेने कष्ट करून महापालिकेच्या मुदत ठेवी 92 हजार कोटींवर नेल्या होत्या. त्या आता 80 हजार कोटींवर आल्या आहेत. अडीच लाख कोटींच्या खड्डय़ात या सरकारने घातलेय महापालिकेला. मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे कधी बुजवता येतील सांगता येत नाही. सरकारने देणी इतकी करून ठेवली आहेत की, जवळपास पुढची 23 वर्षे आपण ती फेडत राहू, अशी भयंकर वस्तुस्थिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडली.
स्पार्टच्या अंतर्गत जी अघोरी शिक्षा होते. चुकीचे समर्थन मी करणार नाही, पण चूक करण्याआधी तो कोणत्या मानसिक तणावाखाली जातोय त्याची चिंता कोण करणार? कधी रेल्वेमंत्र्यांनी येऊन त्यांची विचारपूस केली आहे का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, रेल्वेचे मोटरमन व अन्य कर्मचारी ताणतणावाखाली काम करतात. त्यांच्या हातात रेल्वेगाडी नव्हे तर त्यातून प्रवास करणारे हजारो प्रवासी असतात. त्यांचे जीव त्यांच्या हातात असतात. रेल कामगार सेनेच्या कर्मचाऱयाकडून कोणाच्याही जीविताला धोका पोहोचेल अशी चूक होणार नाही याची हमी शिवसेना घेतेय. पण त्या कामगारांना कसलीही अडचण येणार नाही याची जबाबदारी रेल्वेमंत्री आणि पंतप्रधानांनीही घेतली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
रेल्वेच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटय़ाला भरघोस आले आहे असे सांगितले जात आहे, पण ते जनतेपर्यंत पोहोचणार की नाही हे महत्वाचे आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. रेल्वे स्थानके सुधारणार आहेत की नाही, शौचालयांची व्यवस्था होणार की नाही, रेल्वेची साफसफाई होणार की नाही, असे सवालही त्यांनी उपस्थित केले. यावेळी रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर (बाबी) देव, कार्याध्यक्ष संजय जोशी, सीआरएमएसचे अध्यक्ष प्रवीण वाजपेयी, आमदार महेश सावंत, रमेश कोरगावकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते.
कोकण रेल्वे गोरखपूरला वळवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही उद्धव ठाकरे यावेळी बरसले. ते म्हणाले की, दिल्लीत बसलेली लोकं दिल्लीपुरते बघतात. आताही त्यांनी उफराटा निर्णय घेतला. कोकणची रेल्वे त्यांनी गोरखपूरला वळवली. गोरखपूरला दुसरी ट्रेन न्या. त्याला आमचा विरोध नाही, पण महाराष्ट्राच्या हक्काची कोकण रेल्वे तिकडे वळवून नेणार असाल तर शिवसेना पेटून उठणार, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. अहमदाबादची ट्रेन पाटण्याला नेली असं कधी झालंय का? असा खोचक सवालही त्यांनी केला. रेल्वेचा अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात विलीन केला, कोकण रेल्वे हिंदुस्थानी रेल्वेत मर्ज करण्याची मागणी मात्र पूर्ण झालेली नाही. ही सरकारची मर्जी अजिबात चालणार नाही, असे त्यांनी बजावले.