Badlapur Shocking : बदलापुरात आणखी एक संतापजनक प्रकार; शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य
Saam TV February 07, 2025 06:45 AM

बदलापूर : बदलापुरात पुन्हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बदलापुरात पुन्हा एकदा शाळेत विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका खासगी शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. नराधम शिक्षकावर मागील ३ वर्षांपासून विद्यार्थिनीसोबत विनयभंग करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे.

काय आहे प्रकरण?

पुन्हा एका खाजगी शाळेत विद्यार्थिनीसोबत लाजीरवाणं कृत्य केल्याचं समोर आलं आहे. शाळेतील शिक्षकच विद्यार्थिनीचा 3 वर्षांपासून विनयभंग करत होता, अशी तक्रार पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. ही विद्यार्थिनी इयत्ता सातवीत शिकत होती.

आरोपी तिच्याकडे वारंवार तिच्या आईबद्दल अश्लील टिप्पणी करत होता. त्यामुळे ही मुलगी प्रचंड मानसिक तणावाखाली होती. घरी आल्यानंतर ती आजारी पडली. तिच्या आईने तिला रुग्णालयात नेलं. मुलीच्या आईने या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे आज विद्यार्थ्यांनी शाळेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पीडितेच्या आईने शाळा प्रशासनाला याबाबत जाब विचारला. तसेच बदलापूर पश्चिम पोलिसात तक्रार दिली.

पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं असून बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात पोक्सो आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बदलापुरात शाळेत विद्यार्थिनीसोबत पुन्हा घडलेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जातोय. या शिक्षकाने आणखी काही विद्यार्थिनीसोबत हा प्रकार केलाय का, याचा देखील पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एका शाळेत दोन चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. शाळेतील कर्मचाऱ्याने मुलींसोबत घृणास्पद कृत्य केलं होतं. या प्रकारानंतर बदलापूरकारंनी एकच संताप व्यक्त केला होता. या प्रकरणातील आरोपी पोलिस एन्काउंटरमध्ये मारला गेला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.