मनोरमधील लाल बहादुर शास्त्री हायस्कूलमध्ये दहावीच्या निरोप समारंभादरम्यान एका दुर्दैवी घटनेने सगळ्यांना हादरवून टाकले आहे. या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक संजय लोहार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दहावीच्या निरोप समारंभ मोठ्या उत्साहात सुरू होता. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आणि शाळेतील आठवणींना उजाळा देताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. मात्र, भाषण संपल्यानंतर प्रतिज्ञा घेताना अचानक लोहार यांना हृदयविकाराचा झटका आला. काही क्षणांतच ते जमिनीवर कोसळले, ज्यामुळे समारंभातील वातावरण गडद झाले.
शाळेतील अन्य शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तातडीने लोहार यांना रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांचा जागीच झाल्याचे घोषित केले. ही बातमी ऐकून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय लोहार हे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय शिक्षक होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांचे निधन म्हणजे शाळेसाठी मोठी हानी आहे.
या दुर्दैवी घटनेने शाळेसह संपूर्ण मनोर परिसरात दुःखाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांनी आणि सहकाऱ्यांनी लोहार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची आठवण सदैव जपली जाईल, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी नमूद केले. संजय लोहार यांचा अकाली मृत्यू सर्वांसाठी धक्का आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या कामाच्या ताणतणावांबाबत पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.