यूजीसी मसुद्याच्या नियमांना विरोध करत आहे
Marathi February 07, 2025 06:24 PM

राहुल गांधी यांचा विरोधात सूर

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मसुदा नियमांवरून विरोधी पक्षांचा विरोध तीव्र झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार राज्य सरकारांची सर्व शक्ती स्वत:च्या हातात घेऊ पाहत असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर येथे द्रमुककडून युजीसीच्या नियमांच्या मसुद्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली असून यात राहुल गांधींनी भाग घेतला आहे.विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर युजीसीच्या मसुदा नियमांद्वारे संघाचा अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा उद्देश देशावर ‘एक इतिहास, एक परंपरा, एक भाषा’ लादणे आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश देशाचा अन्य सर्व इतिहास, संस्कृती आणि परंपरांचे उन्मूलन करणे आहे. युजीसीचा मसुदा नियम याची सुरुवात आहे. हा एकप्रकारे राज्यघटनेवर उघड हल्ला आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या शिक्षणप्रणालीसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. प्रत्येक राज्याच्या स्वत:च्या परंपरा, स्वत:चा इतिहास अन् भाषा असते. राज्यघटनेत भारताला ‘राज्यांचा संघ’ म्हटले गेले असून याचा अर्थ हे सर्व इतिहास, परंपरा, भाषा एकत्र मिळून भारताला राज्यांचा संघ करतात आणि याचमुळे आम्हाला याविषयी विचार करावा लागेल. आम्हाला सर्व भाषा, सर्व संस्कृती, सर्व परंपरा आणि सर्व इतिहासांचा सन्मान करावा लागेल, असे उद्गार राहुल यांनी काढले आहेत.

अखिलेश यादवांकडूनही टीका

केंद्र सरकार राज्य सरकारांचे सर्व अधिकार स्वत:कडे घेऊ पाहत आहे. भाजप राजकीय नेत्यांना उद्योगपतींचा नोकर करु पाहत आहे. आम्ही नव्या शिक्षण धोरणाचे कधीच समर्थन करू शकत नाही असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.