38th National Games: तायक्वांदो स्पर्धा संचालकांना अधिकार पुन्हा बहाल; 'मॅच फिक्सिंग'चे आरोप खोटे, न्यायालयाने फटकारले
esakal February 07, 2025 06:45 PM

देहरादून येथे सुरू असलेल्या ३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो खेळाच्या स्पर्धा संचालकांना ‘मॅच फिक्सिंग’चे खोटे आरोप करून ‘जीटीसीसी’ने पदावरून हटविले होते.

याविरोधात तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली, उच्च न्यायालयात कुठलाही पुरावा देता न आल्याने, उच्च न्यायालयाने स्पर्धेचे संपूर्ण अधिकार तायक्वांदो स्पर्धा संचालकांना व ‘टीएफआय’ला पुन्हा बहाल करण्याचा निर्णय दिला आहे.

तायक्वांदो स्पर्धा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे स्पर्धा संचालक टी. प्रवीणकुमार यांच्यावर ‘मॅच फिक्सिंग’चे खोटे आरोप करून त्यांना या पदावरून हटविण्यात आल्याच्या बातम्यांमुळे खळबळ उडाली होती; परंतु दिल्ली उच्च न्यायालयाच्या गुरुवारी आलेल्या या निर्णयामुळे तायक्वांदो खेळाला बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तांत्रिक समिती (जीटीसीसी) यांनी आरोप असलेल्या टी. प्रवीणकुमार यांना तत्काळ त्यांना हटवून एस. दिनेशकुमार यांची नियुक्ती केली होती. या विरोधात तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाने (टीएफआय) दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली होती.

यावर न्यायालयाने सुनावणी करीत स्पर्धेचे संपूर्ण अधिकार तायक्वांदो स्पर्धा संचालकांना पुन्हा बहाल केले आहेत, तसेच ‘टीएफआय’ला स्पर्धा आयोजनाची जबाबदारी बहाल केली आहे. त्यामुळे तायक्वांदो खेळाला ‘मॅच फिक्सिंग’सारखे शब्द वापरून बदनाम करणाऱ्यांनी पुराव्याशिवाय केलेले आरोप उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत.

डॉ. अविनाश बारगजे, अध्यक्ष, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई)तायक्वांदो खेळ ऑलिंपिक क्रीडा प्रकार असून हा खेळ सेंन्सरवर खेळला जातो. कुठल्याही स्पर्धेत संपूर्ण संगणक प्रणालीचा वापर केला जात असल्याने स्पर्धेमध्ये कोणालाही मानवी हस्तक्षेप करता येत नाही, त्यामुळे हा खेळ पारर्दशक आहे. तसेच खेळाडूंना स्वतःचे गुणांकन संगणक प्रणालीद्वारे मोठ्या पडद्यावर पाहता येते. प्रत्येक प्रशिक्षकालाही आपल्या खेळाडूच्या गुणाबद्दल दादही मागता येते.

‘टीएफआय’कडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या व ‘जीटीसीसी’कडून या खोट्या आरोपांमुळे स्पर्धेतील नियुक्ती रद्द करण्यात आलेल्या २० ऑफिशियल व पंचांनाही पुन्हा नियुक्ती बहाल करण्यात आलेली आहे.

न्यायालयाची चपराक

तायक्वांदो संघटनांतील वादाचा आधार घेऊन ‘मॅच फिक्सिंग’सारखे खोटे आरोप करून तायक्वांदो खेळाला बदनाम करणाऱ्यांना उच्च न्यायालयाची ही मोठी चपराकच आहे, असे बोलले जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.