Viral Video Womans Bold Act in Mashhad Captured on Camera : इराणमधील एका महिलेने विवस्त्र होत पोलिसांची गाडी अडवली आहे. तसेच गाडीच्या बोनेटवर चढून सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं असून आता या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. तसेच या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर उलटसूलट चर्चांनाही उधाण आलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, इराणचं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असलेल्या मशहाद या शहरात ही घटना घडली. इराणमध्ये कपडे घालण्यासंदर्भात सरकारने जारी केलेल्या नव्या नियमांचा निषेध म्हणून महिलेने हे कृत्य केल्याचं पुढे आलं आहे.
डिसेंबर महिन्यात इराण सरकारने देशात हिजाब कायदा लागू केला होता. या कायद्यात हिजाब न घालणाऱ्या महिलांना दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद केली होती. महत्त्वाचे म्हणजे या कायद्याला संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांनीही विरोध केला होता. त्यानंतर या कायद्याला स्थगिती देण्यात आली होती.
महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातही इराणमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी तेहरानमधील आझाद विद्यापीठांच्या प्रांगणात एका तरुणीने विवस्त्र होत सरकारचा निषेध केला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तरुणीला ताब्यात घेतले होते. तसेच तिला समज देऊन सोडण्यात आले होते.
इतकंच नाही तर या कायद्याविरोधात इराणमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं बघायला मिळाली होती. यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या एका तरुणींचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. या हिंसक आंदोलनात जवळपास ५५० नागरिकांचा मृत्यू झाला होता.