अकोला : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील एका गावात काकाने चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या मुलीवर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अमोल मिटकरी यांनी आरोपी काकास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
संग्रामपुर तालुक्यात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेची वार्ता करताच सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. या चिमुकलीला अकोला येथे उपचारासाठी आणले आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी काका सुद्धा अटक केली आहे.
मुलीच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन चिमुकलीची भेट घेतली. तिची प्रकृती चिंताजनक आहे.
वैद्यकीय यंत्रणेला चिमुकलीवर सर्वोतोपरी उपचार करण्याचे निर्देश दिले. संबंधित ठाणेदार यांनाही संपर्क करून घटनेची माहिती घेतली. सदर घटना ही दुर्दैवी असून अशा घटना टाळण्यासाठी आरोपी काकास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आमदार मिटकरी यांनी केली आहे. या संदर्भात ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून स्वतः आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.