नांदेड : विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले आहे. आता महापालिका, जिल्हा परिषद, अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच निवडणुका एकत्र लढायच्या आहेत. त्यामुळे सर्वत्र महायुतीचा झेंडा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे पक्ष प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शिंदे यांची येथे गुरुवारी (ता. ६) आभार सभा झाली. आपल्या ४४ मिनिटांच्या भाषणात त्यांनी विविध विषयांची मांडणी केली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला. मंत्री गुलाबराव पाटील, आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, बाबूराव पाटील कोहळीकर, आनंद पाटील बोंढारकर यांच्यासह आजी, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘‘आमदार होण्यासाठी कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी एवढी वर्षे काम केले. आता त्यांच्यासाठी तुम्ही काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छोट्या कार्यकर्त्यांना मोठे करण्याची संधी आपल्याला चालून आली आहे. त्यामुळे ही संधी सोडू नये,’’ असे सांगत शिंदे यांनी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांत महायुतीला चांगले यश मिळायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
माजी मुख्यमंत्री, भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यासह स्थानिक विरोधकांवर शिंदे हे काही भाष्य करतील असे वाटत होते, मात्र शिंदे यांनी त्याविषयी बोलणे टाळले.
‘तेव्हाचा ‘राजा’ कार्यकर्ता, आता घरगडी’‘शिवसेनेच्या कुठल्याही पदापेक्षा शिवसैनिक हे पद मोठे आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणत असत. बाळासाहेबांच्या काळात शिवसैनिक हा राजा होता. त्यांच्यानंतरच्या काळात शिवसैनिकांना घरगड्यांसारखी वागणूक मिळाली,’’ अशी टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी केली.
निर्णय इतिहासात नोंद होणारेशिंदे म्हणाले, ‘‘मराठवाड्याला सुजलाम् सुफलाम् करणारी महत्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मागील सरकारने बंद केली होती. ती आपण पुन्हा सुरू केली आहे. लाडकी बहीण, शेतकरी सन्मान, विद्यार्थी शुल्क माफी, महिलांसाठी एसटीतील सवलत, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ, बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण, वयोश्री आदी योजना यापूर्वीच सुरू केल्या आहेत.
मी मुख्यमंत्री असताना घेतलेले हे निर्णय इतिहासात नोंद होणारे आहेत. हेच काम घेऊन निवडणुकीत जनतेपर्यंत जायचे आहे. प्रामाणिकपणे आपले म्हणणे मांडल्यास जनतादेखील भरभरून यश दिल्याशिवाय राहणार नाही,’’ असा आशावादही शिंदे यांनी व्यक्त केला.