डॉ. राजश्री पाटील - प्राध्यापक, एसएनडीटी महिला विद्यापीठ
दिवाणखान्यात डायनिंग टेबल असणं ही आता निकड झाली आहे. अशा स्थितीत उपलब्ध जागेचा चांगला उपयोग करणं फार आवश्यक असते. जागा कमी असल्यास टेबलटॉप गोल असावा. टेबलटॉप लाकडी, संगमरवरी छान दिसतात. लाकडावर कापड लावून मग त्यावर काच लावली, तर नवीनच छानसं रूप त्याला येईल. आपल्या समृद्ध कलापरंपरेतील इक्कत कलमकारी, बाग प्रिंट, बगरू प्रिंट यांपैकी कोणत्याही शैलीचा उपयोग करून नव्या संकल्पनेचं सुंदर डायनिंग टेबल आकाराला येईल. खुर्च्याना कापड वापरता येईल आणि पाठीला मात्र लाकूड किंवा रनर (बांबूने विणलेले) छान दिसतं. आरामदायकही असतं. टेबलावर चटणी, लोणचं, मीठ यांसाठीच्या मोजक्या बरण्या असाव्यात. पाण्याचं भांडं असावं, चमचे आणि तुपाचं भांडं हाताशी असावं. इथं एक लहानशी फुलदाणी, किंवा इनडोअर प्लॅंट असेल, तर वाहव्वा! रनर टेबलाला देखणा करतो.
दिवाणखान्यात देखण्या कुंड्यामध्ये लावलेली लहानशी रोपटी, संपूर्ण घराला शीतलता प्रदान करतात. घराला ‘हिरवं भान’ असेल, तर ते तृप्त, शांत वाटतं. अडेनिअमची, विविधरंगी फुलांची रोपं सिरॅमिक कुड्यांमध्ये लावलेली असतील, तर छान दिसतात. त्यांना ऊन आणि पाणी दोन्ही कमी लागतं, त्यामुळे घरात ती वाढतातही चांगली.
प्रत्येक ऋतूतील ऊन वेगवेगळ्या दिशांनी घरात येत असतं. हा नैसर्गिक प्रकाश ऊर्जादायी असतो. विशेषत: माघ- पौषातील ऊन आल्हाददायक असतं. घरात हिरवाई असेल, तर पानांवर येणारा सूर्यप्रकाश आणि त्यामुळे भिंतीवर तयार झालेली नक्षी हे मनोरम दृश्य असतं. धुक्यातून वाट काढत आलेले सूर्यकिरण हिरवाईला भेटायला येताना पाहणं सौख्याचं असतं. जुन्या पितळी भांड्यांमध्ये कुंड्या ठेवल्या, तर अधिकच सुंदर दिसू लागतात. दाक्षिणात्य घरांमध्ये लाकडी खांब, फडताळे, पितळी लामणदिवे यांनी जी वातावरणनिर्मिती केलेली असते, तिला तोड नाही. अशी घरं उकाड्यातसुद्धा शांत वाटवणारी असतात. बाहेरच्या रखरखीतपणाचा परिणाम घरातल्या माणसांवर होत नाही.
खिडक्यांना लावण्याचे पडदे हा एक काळजाजवळचा विषय असतो. त्यांवर दिवाणखान्याचं रंगरूप ठरवण्याची मोठी जबाबदारी असते. रुढ पद्धतीचे, रुक्ष प्रकारचे पडदे लावण्यापेक्षा मलमल, कोटा या कापडाचे किंवा सुती कापडावर चिकनकारी केलेले कपडे घराचा तो तो भाग उठावदार करतात. मलमल कापडावर मुघल कलाप्रकारांतील वेलबुट्ट्या छापलेल्या असतील आणि त्यांचे फिकट रंग असतील, तर हे पडदे छानच दिसतात. संध्याकाळच्या वेळी शिणलेला जीव घराच्या ओढीने परत येतो आणि वाऱ्यासोबत खेळणारे हे पडदे पाहतो, तेव्हा थकवा पळून जातो. चहाचं आधण ठेवण्याची अनावर इच्छा होते आणि दिवाणखाना उजळून निघतो.
पडद्यांऐवजी ब्लाइंड्स हाही एक उत्तम असा आधुनिक पर्याय आहे. घड्या होणारे किंवा गुंडाळले जाणारे ब्लाइंड्स घरात पसारा होऊ देत नाहीत. हातमागावर विणलेल्या जरा भरड, जाड कापडाला अस्तर लावून असे पडदे शिवता येतात.
इक्कत कापडाला वितभर रुंदीचं कलमकारी काठ असलेलं कापड किवा ॲप्लिक वर्क केलेलं, चिकनकारी केलेलं कापड घेऊन, त्याला अस्तर लावून दोन्ही प्रकारचे ब्लाइंड्स शिवता येतात.
खास सणवारी लावण्यासाठी म्हणून जुन्या रेशमी साडीचा एक पडदा आणि बाजूचे प्लेन रेशमी पडदे ही अशी सजावटसुद्धा करता येते. दिवाळीनिमित्त घर सजवायचं असेल, तर हॉलमधील कुशनकव्हर्ससुद्धा जुन्या साडीची शिवता येतील. पडदे, कुशन कव्हर्स, रनर्स यांसाठी जुने चंदेरी कापड वगळता इतर रेशमी वस्त्रं वापरता येतात. कापड विरण्याची भीती नसते.