लढा अजून, संपवा एकमेकांना! दिल्लीच्या निकालावरून काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची आप-काँग्रेसवर टीका
esakal February 08, 2025 04:45 PM

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र दिसतंय. दहा वाजेपर्यंत समोर आलेल्या निकालानुसार भाजप ४३ जागांवर तर आप २७ जागांवर आघाडीवर आहे. मतमोजणीचे पहिले कल हाती आल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून काँग्रेस आणि आपवर निशाणा साधला.

सोशल मीडियावरून पोस्ट करत ओमर अब्दुल्ला यांनी खोचक टीका केलीय. महाभारत टीव्ही मालिकेतील एक सीन शेअर करत ओमर अब्दुल्ला यांनी आणखी लढा एकमेकांशी असं म्हटलंय. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा रोख दिल्लीतील काँग्रेस आणि आप यांच्यावर आहे. दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत आहेत.

काँग्रेस आणि आप केंद्रात इंडिया ब्लॉकमध्ये घटक पक्ष आहेत. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी आघाडी केली नाही. सुरुवातीला हरियाणा आणि नंतर दिल्लीत काँग्रेस आणि आप एकमेकांविरोधात लढत आहेत. हरियाणा आणि दिल्ली दोन्ही ठिकाणी भाजपलाच फायदा झाल्याचं दिसून येतंय.

दिल्लीत पाच फेब्रुवारीला मतदान झालं. ७० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत मतदानानंतर एक्झिट पोल्समध्ये भाजपला सत्ता मिळत असल्याचे बहुतांश अंदाज वर्तवण्यात आले आहेत. तर सुरुवातीच्या कलांमध्येही भाजपच्या बाजूने निकाल दिसतोय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.